शाई नदीवरील पुलाचे काम तीन वर्षांपासून रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 12:49 AM2020-11-14T00:49:36+5:302020-11-14T00:50:03+5:30
शहापूर-किन्हवली-सोगाव-कोचरे-टोकावडेमार्गे नगर हा शहापूर ते नगरदरम्यानचा जवळचा मार्ग मानला जातो.
टाेकावडे : शहापूर व मुरबाडला जोडणारा शाई नदीवरील सोगाव-कोचरे दरम्यानचा जुना पूल दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जात असल्याने नागरिकांचा संपर्क तुटतो. यामुळे माजी आमदार पांडुरंग बरोरा व आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नातून नाबार्डमधून शाई नदीवर कोचरे येथे नवा पूल मंजूर करण्यात आला. चार कोटी २५ लाख इतका निधी मंजूर होऊनही या नव्या पुलाचे काम तीन वर्षे रखडले आहे. २०१७ पासून सुरू झालेल्या कामाला गती मिळत नसल्याने फक्त पाच खांब उभे राहिले आहेत. पुलाचे काम कासवगतीने सुरू असल्यानेच माळशेजकडे जाणारा हा जवळचा व महत्त्वाचा मार्ग वारंवार बंद होतो.
शहापूर-किन्हवली-सोगाव-कोचरे-टोकावडेमार्गे नगर हा शहापूर ते नगरदरम्यानचा जवळचा मार्ग मानला जातो. त्यामुळे शहापूरहून नगरकडे जाणारे बहुतांंश वाहतूकदार सरळगावऐवजी सोगाव-कोचरेमार्गे माळशेजकडे जातात. मात्र, या मार्गावरचा जुना पूल कमी उंचीचा व मोडकळीस आलेला असल्याने दर पावसाळ्यात वाहतूक बंद ठेवावी लागते. त्यामुळे सोगाव परिसर व कोचरे परिसरातील टोकावडे, शिरोशी, माळ, खापरी, सोगाव, किन्हवली, टाकीपठार, खरांगण या गावांचा अनेक दिवस संपर्क तुटतो.