नवी मुंबई : शहरातील एकमेव ऐतिहासिक वारसास्थळ असलेल्या बेलापूर किल्ल्याचे संवर्धन करण्याच्या कामास रविवारी सुरुवात केली. बुरुजांची डागडुजी करण्यात येणार असून अॅम्पीथिएटरसह इतर सुविधाही उपलब्ध केल्या जाणार आहेत.पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेला बेलापूर किल्ला १७३७ मध्ये मराठ्यांनी जिंकला. खाडीकिनाऱ्याच्या रक्षणासाठी इतिहासामध्ये या किल्ल्याला महत्त्व आहे. सद्यस्थितीमध्ये येथील बुरूज ढासळू लागले होते. किल्ल्याचे संवर्धन व्हावे, यासाठी लोकप्रतिनिधी व इतिहासप्रेमींनी पाठपुरावा सुरू केला होता. सिडकोने किल्ला संवर्धनासाठी १७ लाख रुपयांचा आराखडा तयार केला आहे. यामध्ये बुरुजांची डागडुजी करणे, स्वागत कक्ष उभारणे, टेहळणी बुरूज विकसित करणे, पायरी मार्ग तयार करणे, अॅम्पीथिएटर व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. संवर्धन व सुशोभीकरण करण्याचा आराखडा तयार करण्याचे काम किमया आर्किटेक्टला देण्यात आले आहे. या ठिकाणी खुला रंगमंचही तयार केला जाणार आहे. येथे सहलीसाठी येणाºया नागरिकांना ध्वनी-प्रकाश योजनेवर आधारित किल्ल्याची माहिती सांगणारा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. छोटेखानी उद्यान व कारंजेही विकसित केले जाणार आहेत. किल्ला संवर्धनाच्या कामाचा शुभारंभ रविवारी सिडको अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. ऐतिहासिक वारसा सांगणाºया वास्तूंकडे सिडको दुर्लक्ष करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे, ऐरोलीचे आमदार संदीप नाईक, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, अशोक शिनगारे, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., सुनील पाटील, रामदास शेवाळे, केशव वरखेडकर उपस्थित होते.
बेलापूर किल्ला संवर्धनाचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 1:24 AM