कळंबोली : सायन-पनवेल महामार्ग खड्डेमुक्त करण्याबरोबरच लगतच्या आरसीसी गटारांचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. पावसाळ्याआधी हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र बहुतांश ठिकाणची कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होऊन महामार्गावर पाणी साचण्याची शक्यता आहे.
खड्ड्यांमुळे पनवेल-सायन महामार्गावर अक्षरश: चाळण झाली होती. बांधकाम विभागाकडून त्यावर उपाययोजना म्हणून ज्या ठिकाणी खड्डे पडले होते, त्याठिकाणी काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर कळंबोली वसाहत ते कामोठे बसथांबा, कोपरा गाव येथे कोट्यवधी रुपये खर्च करून आरसीसी नाले बांधण्याचे काम सुरू केले आहे. पावसाळ्याआधी हे काम पूर्णत्वास नेण्यात येईल, असे विभागाकडून सांगण्यातही आले होते. मात्र अद्याप बहुतांश कामे अपूर्ण असल्याने यंदाही महामार्ग पाण्यात जाण्याची शक्यता आहे.गेल्या तीन वर्षांपासून महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने वाहनांना पाण्यातूनच वाट काढावी लागते. गुडघाभर पाण्यातून वाहने गेल्याने त्यात पाणी शिरून वाहने बंद पडतात. यंदा बांधकाम विभागाने नाल्यातील गाळ तसेच मोऱ्या काढून उपाययोजना केल्या असल्या तरी ही कामे अपूर्ण आहेत. यासाठी तब्बल १८ कोटी रुपये खर्च करण्यात आले असले तरी काम पूर्ण न झाल्याने यंदाही चालक तसेच पादचाऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता एकता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अमोल शितोळे यांनी व्यक्त केली आहे.पावसाळ्यात रस्त्यावर पाणी भरल्यास नाले, खड्डे दिसत नाहीत. त्यामुळे दुचाकी, चारचाकी, अवजड वाहने फसले जाऊन दुर्घटना होण्याची शक्यता असल्याचे मत खारघर विकास समितीचे अध्यक्ष भूषण म्हात्रे यांनी व्यक्त केले. काँक्रीटीकरणासाठी ७७ कोटी तसेच नाल्यासाठी १८ कोटी रुपये खर्च करूनही यंदा पावसाळ्यात त्रास कायम राहणार आहे. या संदर्भात बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.महामार्गावरील भुयारी मार्ग बारा महिने पाण्यातमहामार्गावर कामोठे व कळंबोली वसाहतीत जाण्यासाठी भुयारी मार्ग बांधण्यात आले आहे. याचा प्रवाशांसाठी आजतागायत कधीच उपयोग झाला नाही. कारण बारा महिने यात पाणी साचत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे प्रवासी महामार्ग ओलांडताना लहान-मोठे अपघात घडल्याचे नागरिक सांगतात.