नवी मुंबई : महानगरपालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीने काम करा. शासनाने केलेली लोकोपयोगी कामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन मत्सव्यवसायमंत्री अस्लम शेख यांनी काँग्रेसच्या आढावा बैठकीमध्ये केले आहे. कार्यकत्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील गांधी भवन येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली हाेती. या बैठकीमध्ये संपर्कमंत्री अस्लम शेख यांनी निवडणुकीविषयी आढावा घेतला. महाविकास आघाडी सरकारने एक वर्षात अनेक लोकोपयोगी कामे केली आहेत. मच्छीमारांसाठी पॅकेज दिले आहे. डिझेल थकबाकीसाठी ९० कोटी रुपये मंजूर केले आहेत. शासनाने एक वर्षात केलेली कामे नागरिकांपर्यंत पोहोचवा. प्रत्येक प्रभागातील प्रत्येक घरात सरकारने केलेल्या कामांची माहिती पोहोचवा. कार्यकर्त्यांनी कामाची विभागणी करून जबाबदारी वाटून घ्या. पक्ष पूर्ण ताकदीने तुमच्यासोबत असेल, असे आश्वासनही अस्लम शेख यांनी यावेळी दिले. या बैठकीला जिल्हा अध्यक्ष अनिल कौशीक, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, अंकुश सोनावणे, सुधीर पवार, प्रवक्त्या निला लिमये, प्रदेश कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन, मोहन जोशी, रामचंद्र दळवी, राहुल दिवे, शितल म्हात्रे आदी यावेळी निवडणुकीविषयी आढावा घेण्याच्या बैठकीला उपस्थित होते.
पालिका निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने काम करा - अस्लम शेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 12:22 AM