खाडीपुलावरून आत्महत्यांना बसणार आळा, सुरक्षा जाळी बसविण्याचे काम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 12:17 AM2020-12-22T00:17:34+5:302020-12-22T00:17:59+5:30
Vashi : मुंबई व नवी मुंबईला जोडणारा वाशी खाडीपूल हा आत्महत्येचे ठिकाण म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.
नवी मुंबई : वाशी खाडीपुलावरून होणाऱ्या आत्महत्येच्या घटनांना अखेर आळा बसणार आहे. पुलाला सुरक्षा जाळी नसल्याने नैराश्यात असलेल्या व्यक्तींना तेथून उडी मारण्याची संधी मिळत होती. त्यानंतरही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने उद्भवत असलेल्या समस्यांबाबत ‘लोकमत’ने सातत्याने आवाज उठवला होता.
मुंबई व नवी मुंबईला जोडणारा वाशी खाडीपूल हा आत्महत्येचे ठिकाण म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. प्रतिवर्षी साधारण ५० हून अधिक व्यक्ती या खाडीपुलावरून खाडीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करत असतात. पुलाच्या सुरक्षा कठड्याची उंची कमी असल्याने त्यांना पुलावरून उडी मारणे सहज शक्य होते. नुकतीच एक महिला खाडीत निर्माल्य टाकत असताना तोल जाऊन पडली होती. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पुलाच्या सुरक्षा कठड्याची उंची वाढवावी अथवा जाळी उभारण्याची मागणी वाहतूक व शहर पोलिसांकडून सातत्याने होत होती. त्या अनुषंगाने अनेकांनी वेळोवेळी पाहणी दौरेदेखील केले होते. खाडी पुलावरून उडी मारणाऱ्या व्यक्तींच्या बचावासाठी पोलीस, अग्निशमन तसेच मच्छीमार बांधव यांना धोका पत्करावा लागत होता. पर्यायी पुलालगत वाशी पोलिसांची दिवस-रात्र गस्त ठेवण्यात आली आहे. वेळप्रसंगी त्यांच्या मदतीला मच्छीमार बांधव धावून येतात. यामुळे आत्महत्येच्या प्रयत्नात पुलावरून उडी मरणाऱ्यांपैकी बहुतांश व्यक्तींचे प्राण वाचवण्यात आले आहेत. परंतु पोलिसांकडून मागणी होऊनदेखील पुलावर सुरक्षा जाळी बसवली जात नसल्याने आत्महत्यांची मालिका सुरूच आहे. त्याबाबत लोकमतने अनेकदा वृत्त प्रसारित करून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला होता. अखेर खाडीपुलाभोवती सुरक्षा जाळी बसण्याच्या कामाला मुहूर्त मिळाला आहे. त्यासाठी चाचणीकरिता जाळी बसवण्यात आली आहे. लवकरच पुलाच्या दोन्ही बाजूंचा मोकळा भाग या जाळीने बंदिस्त केला जाणार आहे. त्यामुळे नैराश्यात आत्महत्येच्या प्रयत्नात खाडीपुलावरून उडी मारणाऱ्यांना आळा बसणार आहे.