नवी मुंबई : महापालिकेच्या सचिव विभागाविषयी नाराजी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. निवडणुकीपासून सहा महिन्यांत झालेल्या सभांचे इतिवृत्त चार दिवसांपूर्वी नगरसेवकांना अभ्यासण्यासाठी पाठविण्यात आले व शुक्रवारच्या सभेत त्यास मंजुरी घेण्यात आली. नियमबाह्यपणे कामकाज सुरू करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेनेना नगरसेवक नामदेव भगत यांनी केला असून, याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महापालिकेच्या कामकाजामध्ये सचिव विभागाला अनन्यसाधारण महत्त्व असते. सभांचे आयोजन करणे, त्यांचे इतिवृत्त ठेवणे व सभांची विषयपत्रिका लोकप्रतिनिधींकडे पाठविण्याचे काम या विभागाकडून केले जाते. कोणतीही सभा झाल्यानंतर त्याचे इतिवृत्त तत्काळ तयार करून पुढील सभेमध्ये त्याला मंजुरी घेणे आवश्यक असते. जोपर्यंत इतिवृत्त मंजूर होत नाही तोपर्यंत ते कामकाज ग्राह्य समजले जात नाही. परंंतु महापालिकेतील सचिव विभागाने मे महिन्यापासून झालेल्या सभा, विशेष सभा यांचे इतिवृत्त वेळेत तयार केले नाही. सहा महिन्यांचे इतिवृत्त चार महिन्यांपूर्वी सर्व नगरसेवकांना पाहण्यासाठी पाठविण्यात आले. ५०० पेक्षा जास्त पानांचे अहवाल पाहून नगरसेवकही आवाक् झाले. चार दिवसांमध्ये एवढे कसे वाचायचे, सहा महिन्यांपूर्वी सभेमध्ये काय बोललो, ते तसेच नोंद झाले आहे का, हे कसे तपासयचे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सर्वसाधारण सभेमध्ये नामदेव भगत यांनी यास स्पष्ट आक्षेप घेतला. सचिवांनी नियमबाह्यपणे कामकाज सुरू केले आहे. सहा महिन्यांचे इतिवृत्त एकाच वेळी मंजूर करणे ही कोणती पद्धत आहे. जाणीवपूर्वक हे प्रकार होत असून, काही जणांच्या मनाप्रमाणे इतिवृत्त तयार केले जात असण्याची शंका त्यांनी उपस्थित केली.इतिवृत्त कधी सादर करावे, याविषयीचा नियम भगत यांनी सर्वसाधारण सभेत वाचून दाखविला. सभा संपल्यानंतर तत्काळ दोन दिवसांत किंवा कमीत कमी वेळेत ते तयार करून अवलोकनासाठी पाठवून द्यावे व पुढील सभेमध्ये त्याला मंजुरी घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन सचिव विभागाने केले असून, याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. इतिवृत्त कायम करू नये. सर्व नगरसेवकांना ते सविस्तर वाचण्यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी केली. परंतु महापौरांनी इतिवृत्त मंजुरीला टाकून मंजूर करून घेतले. सचिव चित्रा बाविस्कर यांनीही इतिवृत्त देण्यास विलंब झाल्याचे मान्य केले. इतिवृत्त वेळेत तयार झाले होते, परंतु त्याच्या झेरॉक्स काढणे आणि इतर कामांसाठी विलंब झाला, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
महापालिका सचिव विभागाचे काम नियमबाह्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2015 1:08 AM