निधीअभावी रखडले मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 01:56 AM2020-08-17T01:56:03+5:302020-08-17T01:56:10+5:30
प्रेमीयुगुलांसाठी अर्धवट अवस्थेतील ही पोलीस इमारत म्हणजे एक ‘लव्हर्स पॉइंट’च ठरू लागली आहे.
मधुकर ठाकूर
उरण : मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे बांधकाम ८५ लाख रुपये खर्चूनही मागील वर्षीपासून अपुऱ्या निधीअभावी अर्धवट अवस्थेत पडून आहे. बांधकामासाठी कमी पडत असलेल्या ५० लाखांच्या निधीसाठी उरणच्या ओएनजीसीला साकडे घातले आहे. मात्र, ओएनजीसीने कबूल केल्यानंतरही विविध तकलादू कारणे देत, निधी देण्यास दिरंगाईच चालविलेली आहे. त्यामुळे अर्धवट असलेल्या ओसाड इमारतीचा गैरफायदा येथील युवा प्रेमी पुरेपूर उठविताना दिसत आहेत. प्रेमीयुगुलांसाठी अर्धवट अवस्थेतील ही पोलीस इमारत म्हणजे एक ‘लव्हर्स पॉइंट’च ठरू लागली आहे.
उरण तालुक्यासाठी तीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये देशाच्या सुरक्षेला सागरी मार्गावरून अधिक धोका संभवत असल्याचे लक्षात घेऊन, स्वतंत्ररीत्या कारभार पाहणाºया मोरा सागरी पोलीस ठाण्याचा समावेश आहे. मोरा येथे सध्या अस्तित्वात असलेल्या पोलीस ठाण्याची जागा अपुरी पडत आहे. अपुºया जागेमुळे अनेक गैरसोयींचा सामना पोलीस कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार पोलीस ठाणे उभारणीसाठी वन, बंदर व महसूल विभागाकडे जागेची मागणी करण्यात आली होती. मात्र, मोरा बंदराच्या जवळपास शासनाकडून इमारतीसाठी जागा अखेरपर्यंत मिळालीच नाही. यामुळे मोरा येथील जुन्या जागेतच मागील अनेक वर्षांपासून पोलीस ठाण्याचा कारभार सुरू असतानाच, तीन वर्षांपूर्वी मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीसाठी शासनाने आवश्यकतेनुसार जागा उपलब्ध करून दिली आहे.
उरण शहरातील शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाच्या अगदी समोरच्या जागेतच मोरा सागरी पोलीस ठाण्याची नवीन इमारत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पोलीस ठाण्याच्या आवश्यकतेनुसार अद्ययावत इमारत उभारण्याच्या बांधकामासाठी ८५ लाखांच्या निधीच्या तरतुदीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र, सुमारे ४५० चौमी क्षेत्रफळाच्या जागेवर उभारण्यात येणाºया एकमजली इमारतीच्या कामासाठी ८५ लाखांचा निधी अपुरा पडला आहे. या अपुºया निधीअभावी मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे काम मागील वर्षीपासून अर्धवट अवस्थेत पडून आहे.
मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारत उभारण्याच्या बांधकामात अतिरिक्त वाढ झाली आहे. काही तांत्रिक कारणांमुळेही बांधकाम खर्च ५० लाखांनी वाढला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रदीप सूर्यवंशी यांनी दिली. अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी शासन आणि ओएनजीसीकडे ५० लाखांची मागणी करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही निधी उपलब्ध झाला नसल्यानेच मोरा सागरी पोलीस ठाण्याची नवीन इमारत उभारण्याचे काम मागील वर्षापासून रखडले असल्याचे मुख्य अभियंता प्रदीप सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.
>जुन्या अपुºया जागेत होते कामकाज
पोलीस ठाण्याचे कामकाज योग्य प्रकारे चालविण्यासाठी अद्ययावत इमारत आणि जागेची आवश्यकता आहे. मोरा पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे बांधकाम निधीअभावी रखडल्याने जुन्या अपुºया जागेतच कामकाज करण्याची वेळ पोलीस ठाण्यावर आली आहे.
पोलीस ठाण्याच्या अर्धवट राहिलेल्या नवीन इमारतीच्या कामासाठी आवश्यकता असलेल्या ५० लाखांचा निधी सीएसआर फंडातून उपलब्ध करून देण्याची विनंती ओएनजीसीकडे करण्यात आली आहे. त्यांनीही निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर मागील काही महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.
मात्र निधी मंजुरीसाठी प्रस्ताव केंद्र सरकारच्या संबंधित विभागाकडे पाठविण्यात आला असल्याचे ओएनजीसी प्रशासनाकडून सांगण्यात येत असल्याची माहिती मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपन शिंदे यांनी दिली. रखडलेल्या कामामुळे अनेक अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येत असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.