वैभव गायकर
पनवेल : पनवेल मध्ये सध्य स्थितीत काम अंतिम टप्प्यात असलेल्या मुंबई ऊर्जा प्रकल्पामुळे मुंबई महानगरात दोन हजार मेगावॅट वीज उपलब्ध होणार आहे.या प्रकल्पाच्या माध्यमातून मिळणारी वीज ही हरित ऊर्जा प्रकाराची असल्याने ग्राहकांच्या खिशावरचा भार काही प्रमाणात का होईना, हलका होणार आहे.दोन महिन्यात हे काम पूर्णत्वास येणार आहे.
गुजरात राज्यातील कच्छमधल्या दोदरा येथे सौरऊर्जा आणि पवन ऊर्जेच्या माध्यमातून निर्माण केली जाणारी वीज मुंबई महानगर प्रदेशाकरिता आणण्याचा उपक्रम ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने हाती घेण्यात आला आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी साधारणतः दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.सध्या कार्यान्वित असलेल्या अति उच्च दाबाच्या वीजवाहिन्या वाढलेली विजेची मागणी लक्षात घेता वीज पारेषण करण्यासाठी पुरेशा सक्षम नाहीत. साधारणतः पाच ते सहा दशकांपूर्वी उभारलेले हे वीजवाहिन्यांचे जाळे. दिवसेंदिवस वाढत जाणारी विजेची मागणी त्यामुळे अतिरिक्त वीज आणण्यासाठी या वीजवाहिन्या प्रभावी ठरत नाहीत. यासाठी अति उच्चदाब वीजवाहिन्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात तयार करणे, ही आता वीजकंपन्यांपुढे मोठी गरज बनली आहे.
मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून अति उच्चदाबाच्या वीजवाहिन्यांचे जाळे तयार करण्याचे काम वेगाने सुरु आहे.पनवेल मध्ये प्रकल्पाला होणार विरोध पाहता भूसंपादनाच्या बाबतीत स्थानिक जमीनधारकांना समाधानकारक मोबदला देण्यासाठी जे शक्य होईल, ते सर्व करण्याचा मुंबई ऊर्जा प्रकल्पाची भूमिका आहे.एकीकडे वाढलेला विजेचा वापर तर दुसरीकडे अधून मधून खंडित होणारा विद्युतपुरवठा यामुळे सर्वसामान्य लोकांना त्रास सहन करावा लागतो. तसेच वीजवितरण नियोजनाच्या दृष्टीने पूर्वनियोजित वीज बंद है देखील नागरिकांची नवी डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे मुंबई ऊर्जा मार्ग व त्यासारख्या आणखीन प्रकल्पांच्या माध्यमातून अतिरिक्त वीज पारेषण क्षमता निर्माण न केल्यास भविष्यात विजेचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासणार आहे.मुंबई महानगर,नवी मुंबई तसेच नव्याने होऊ घातलेल्या महामुंबईची विजेची मागणी लक्षात घेता हि सर्व गरज या प्रकल्पामुळे भरून निघणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश झपाट्याने विकसित होत आहे. सुनियोजित विकासाची सगळ्यात पहिली गरज म्हणजे अखंडित वीजपुरवठा, ज्याप्रमाणात या प्रदेशाचा विकास होतो आहे. ते पाहता येत्या काळात अतिरिक्त विजेची गरज भासणार आहे. सध्याच्या पारेषण प्रणालीमध्ये नव्या अति उच्च दाब वाहिन्यांची नितांत गरज आहे. त्यामुळे नियोजित प्रकल्पांच्या माध्यमातून अतिरिक्त वीज वाहिन्या उभारुन भविष्यात विजेचा हा तुटवडा भरून काढणे सोपे होणार आहे.
-डॉ. संजीव कुमार(अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण)