लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : सायन - पनवेल महामार्गावरील वाशी खाडीवर तिसरा पूल उभारण्यात येत आहे. या पुलाची एक मार्गिका मे २०२४ पर्यंत पूर्ण होईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री (एमएसआरडीसी) दादाजी भुसे यांनी पाहणी केल्यानंतर सांगितले. त्यामुळे मुंबई आणि नवी मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सध्या तरी सुटका होणार नाही, असेच दिसून येत आहे. राजधानी मुंबईला नवी मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्राशी जोडणाऱ्या वाशी खाडीवरील तिसऱ्या पुलाची गुरुवारी सकाळी मंत्री भुसे यांनी पाहणी केली.
दोन्ही बाजूंच्या पुलांचे काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत ऑगस्ट २०२४ असून, त्यातील एका बाजूकडील ३ लेनचा पूल मे २०२४ पर्यंत तर संपूर्ण पूल सप्टेंबर २०२४ अखेरीस पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
७७५ कोटींहून अधिक खर्च
मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या या बहुचर्चित तिसऱ्या पुलाच्या निर्मितीसाठी सुरुवातीला कांदळवनाचा अडथळा निर्माण झाला होता; परंतु सर्व अडथळे पार झाल्यानंतर रस्ते विकास महामंडळाने एल ॲण्ड टी कंपनीला कार्यादेश दिले आहेत. त्यानुसार वेगाने काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यावर वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे. या कामावर ७७५ कोटींहून अधिक खर्च करण्यात येत आहे.
टोलनाका परिसरात वाहतूककोंडी
नवी मुंबई आणि मुंबईला जोडणारा पहिला खाडी पूल १९७१, तर दुसरा खाडी पूल १९९५ मध्ये सुरू झाला आहे. मधल्या काळात शीव-पनवेल महामार्गावरील वाहतुकीत मोठी वाढ झाली. यामुळे दोन्ही बाजूंच्या टोलनाक्यांच्या परिसरात दररोज वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे यातून सुटका करण्यासाठी या तिसऱ्या पुलाचे बांधकाम सुरू आहे.