कळंबोली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते रेल्वे स्थानक रोडचे नुकतेच काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. रस्त्यावर पथदिवे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी रस्ता प्रकाशमय झाला आहे. वाहने या रस्त्यावरून सुसाट धावत आहेत. आता रस्त्यावरील दुभाजकाच्या कामाला ठेकेदाराकडून सुरुवात झाली आहे. दरवर्षी खड्ड्यातून रस्ता काढावा लागणाऱ्या पनवेलकरांना आता दिलासा मिळाला आहे.पनवेल शहरातील महापालिकेकडून अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. कोरोना संसर्गामुळे कामाला ब्रेक देण्यात आला होता. ती कामे जुलैपासून सुरू करण्यात आली आहेत. पनवेल शहरांतून जाणाऱ्या महामार्गावरील पुलाचे काम करत असताना, वाहने बसस्थानकाच्या पाठीमागील रस्त्यावरून वळविण्यात आली होती. त्याचबरोबर, पनवेल रेल्वे स्थानक गाठण्यासाठी याच रस्त्याचा वापर केला जात असल्याने, या ठिकाणी वाहनाची वर्दळ मोठी आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्याची दुरवस्था झाली होती. रस्ता दुरुस्तीची मागणी नागरिकांकडून वारंवार करण्यात आल्याने, महापालिकेने ठेकेदारामार्फत या रस्त्याचे काम सुरू केले आहे. ६०० मीटर लांब तर १८ मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी साडेचार कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात आला आहे. यात सांडपाणी वाहिन्या, भूमिगत गटारे, विद्युत जोडणी, दुतर्फा बंदिस्त गटारे, त्याचबरोबर २८ पथदिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे, तर आता दुभाजकाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
झोपडपट्टीचा त्रास कायमरस्त्यावरील होणारी पार्किंग आणि रस्त्यांच्या कडेला असलेल्या नवनाथनगर झोपडपट्टीचा त्रास वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात होत आहे. रस्त्यावर वाहने आडवी-तिडवी पार्क केली जात आहेत. त्यामुळे चारचाकी वाहने, एनएमएमटी बसेस चालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. झोपडपट्टीतील लहान मुले रस्त्यावर खेळत असतात. त्यामुळेही लहान-मोठे अपघात होत असून, झोपडपट्टीधारक आणि वाहन चालकात नेहमी वाद होत आहेत.