नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २० मधील हाशा ठाकूर तलावातील गाळ काढण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. तलावाच्या संरक्षण भिंतींचीही डागडुजी केली जाणार असून बाजूच्या शांताराम भोपी उद्यानाची दुरूस्ती करण्याचीही मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे. तलाव व्हिजनअंतर्गत महापालिकेने सुशोभीकरण केलेल्या तलावांमध्ये नेरूळ सेक्टर २० मधील हाशा ठाकूर उद्यानाचाही समावेश आहे. सुशोभीकरण करून जवळपास दहा वर्षे झाल्यामुळे तलावाला लागून असलेली संरक्षण जाळी तुटली आहे. विद्युत खांब कोलमडले आहेत. तलावाच्या भिंतीला अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. तलावामध्ये मोठ्या प्रमाणात गाळही साचला आहे. स्थानिक नगरसेवक काशिनाथ पवार यांनी तलावातील गाळ काढून त्याची दुरूस्ती करण्याची मागणी केली होती. पालिका प्रशासनाने गाळ काढण्याचे काम सुरू केले आहे. किरकोळ दुरूस्तीची कामेही सरु आहेत.तलावाला लागूनच शांताराम भोपी उद्यान आहे. या उद्यानातील खेळणी तुटली आहेत. तुटलेल्या खेळण्यांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. रात्री या उद्यानामध्ये मद्यपी गर्दी होते. रोज सकाळी उद्यानामधून एक गोणी दारूच्या बॉटल सापडू लागल्या आहेत. या उद्यानाची दुरूस्ती करून सुरक्षा रक्षक नेमाण्याची मागणीही पवार यांनी केली आहे.
तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू
By admin | Published: April 25, 2017 1:16 AM