चिरनेर : जेएनपीटी बंदरातील ‘गेटवे टर्मिनल आॅफ इंडिया’च्या (जीटीआय) कामगारांचे आंदोलन मंगळवारपासून आणखी चिघळले. संतप्त कामगारांनी संपूर्ण जीटीआय बंदराचे काम बंद केले. मागील २४ जुलैपासून या नोकरीत कायमस्वरूपी करण्यात यावे, या मगाणीसाठी कामगारांचे करळफाटा येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. सोमवारी जेएनपीटीचे संचालक नीरज बन्सल यांनी मध्यस्थी करून जीटीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी आर. गायतोंडे, कंपनी व्यवस्थापन आणि सर्वपक्षीय संघर्ष समितीचे नेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी आमदार विवेक पाटील, आमदार मनोहर भोईर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिनेश पाटील, जेएनपीटी विश्वस्त भूषण पाटील आणि समितीचे निमंत्रक अतुल पाटील यांच्यात चर्चा घडवून आणली. मात्र कोणताही तोडगा न निघाल्याने मंगळवारपासून कामगारांनी काम बंद पाडले. जेएनपीटी बंदरातील हे टर्मिनल जीटीआय या खासगी बंदराकडे चालवायला दिले आहे. जीटीआयने या बंदरातील कंटेनर हाताळणीचे काम महेश एंटरप्रायझेस या कंपनीकडे दिले आहे. गेल्या नऊ वर्षांपासून १९४ कामगार हे कंटेनर हाताळणीचे काम करत आहेत. मात्र गेल्या ९ वर्षांपासून या कामगारांना कोणत्याही सुविधा दिल्या जात नसून त्यांना नोकरीमध्ये कायम देखील केले जात नाही.
जीटीआयमध्ये काम बंद
By admin | Published: August 05, 2015 12:13 AM