नेरूळ-उरण रेल्वेमार्गावरील तरघर स्थानकाचे काम ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 12:39 AM2020-06-17T00:39:29+5:302020-06-17T00:39:40+5:30
सिडकोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प : लॉकडाऊनमुळे मजुरांचे स्थलांतर
नवी मुंबई : नेरूळ-उरण रेल्वेमार्गावर तरघर हे अत्याधुनिक दर्जाचे स्थानक उभारले जात आहे. मागील तीन वर्षांपूर्वी सिडकोने या स्थानकाचे काम हाती घेतले होते. प्रत्यक्षात ३0 महिन्यांत हे काम पूर्ण करण्याची अट कंत्राटदारासमोर ठेवण्यात आली होती. परंतु मुदत केव्हाच उलटून गेली आहे. सध्या तर लॉकडाऊनमुळे मजुरांनी स्थलांतर केल्याने अगोदरच कुर्मगतीने सुरू असलेले काम मागील तीन महिन्यांपासून आणखी रखडले आहे.
नेरूळ-उरण मार्गावर एकूण १0 रेल्वे स्थानके आहेत. यात नेरूळ-सीवूड्स, सागरसंगम, तरघर, बामणडोंगरी, खारकोपर गव्हाण, रांजणपाडा, न्हावा-शेवा, डोंगरी व उरण या स्थानकांचा समावेश आहे. सध्या पहिल्या टप्प्यातील पाच स्थानकांपर्यंतचे काम पूर्ण झाले असून सीवूड ते खारकोपरपर्यंतचा पहिला टप्पा ४ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. या मार्गावरील सागरसंगम स्थानकानंतर पहिल्या क्रमांकाचे तरघर स्थानक अत्याधुनिक दर्जाचे करण्याचा सिडकोचा मानस आहे. या स्थानकाच्या उभारणीसाठी ११२ कोटी १२ लाख रुपये खर्च अपेक्षित असून बी.जी. बेलेकर कंपनीला हे कंत्राट दिले आहे. तरघर हे भव्य व दिव्य रेल्वे स्थानक ठरणार आहे. यात २७0 मीटर लांबीचे चार फलाट प्रस्तावित आहेत. स्थानकाच्या इमारतीत वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरूळ, सीबीडी स्थानकाच्या धर्तीवर वाणिज्य कॉम्प्लॅक्स उभारले जाणार आहे. यात विविध कार्यालयांसह दोन तिकीट कार्यालये असणार आहेत. तर स्थानकाच्या पहिल्या मजल्यावर वाहनतळ प्रस्तावित असून वाहनतळावर जाण्यासाठी रॅम्पची सुविधा असणार आहे. एकूणच तरघर स्थानक नेरूळ-उरण मार्गावरील वास्तुशिल्पाच्या दृष्टीने एक आकर्षण ठरेल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी ३0 महिन्यांची मुदत आहे. परंतु ही मुदत केव्हाच उलटून गेली आहे. आता लॉकडाऊनमुळे मजुरांनी स्थलांतर केल्याने या कामाला खीळ बसली आहे. सध्या मजूर नसल्याने सिडकोच्या अनेक प्रकल्पांची कामे बंद पडली
आहेत.
तरघर स्थानकाची उपयुक्तता
शिवडी-न्हावा-शेवा सी-लिंक या प्रकल्पाला जोडला जाणारा कोस्टल रोड तरघर स्थानकाला लागूनच असलेल्या पामबीच मार्गाला जोडला जाणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील खांदेश्वर स्थानकापासून नियोजित तरघर स्थानकादरम्यान स्कायट्रेन सुरू करण्याची योजना आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईतून नवी मुंबईत येण्यासाठी तरघर हे केंद्रबिंदू ठरणार.
प्रकल्पावर काम करणाऱ्या बहुतांशी मजुरांनी लॉकडाउनमुळे स्थलांतर केले आहे. त्यामुळे काम बंद ठेवावे लागले आहे. असे असले तरी पर्यायी मनुष्यबळ उपलब्ध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. मजुरवर्ग उपलब्ध होताच कामाला पुन्हा सुरूवात केली जाईल.
- प्रिया रतांबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको