नवी मुंबई : हार्डेलिया केमिकल कंपनीमुळे कुकशेत गावचे १९९५ मध्ये नेरूळमध्ये पुनर्वसन करण्यात आले. गावचे स्थलांतर झाले, परंतु मंदिर मात्र जुन्याच ठिकाणी असल्याचे दु:ख ग्रामस्थांना सदैव होत होते. शासनाकडून मिळालेल्या भूखंडावर शनिवारी मंदिराच्या कामाचे भूमिपूजन झाल्यामुळे २० वर्षांनंतर ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नवी मुंबई वसविण्यासाठी सिडकोने ठाणे, उरण व पनवेल तालुक्यामधील ९५ गावांतील शेतकऱ्यांची जमीन संपादित केली होती. परंतु मुळ गावे आहे त्याच ठिकाणी ठेवण्यात आली. एमआयडीसीनेही ठाणे-बेलापूर पट्ट्यातील जमीन संपादित केल्यानंतर तेथील गावांसाठीही आहे त्याच ठिकाणी ठेवण्याचा निर्णय झाला. परंतु जुईनगर रेल्वे स्टेशनसमोर हार्डेलिया केमिकल कंपनी सुरू झाल्यानंतर येथील कुकशेत गाव स्थलांतर करण्याची मागणी कंपनीने केली. भोपाळसारखी दुर्घटना होऊ नये म्हणून स्थलांतर करावे, अशी याचिका न्यायालयात दाखल केली. न्यायालयाच्या आदेशानंतर कुकशेत गाव १९९५ मध्ये नेरूळमध्ये स्थलांतर करण्यात आले. गाव स्थलांतर झाले तरी गावातील मंदिर मात्र जुन्याच ठिकाणी होते. प्रत्येक वर्षी यात्रेला कंपनीची परवानगी घेऊन मंदिरात जावे लागत होते. गावदेवी मंदिर व गावदेवी तलाव हीच नवी मुंबईमधील सर्व गावांची सर्वात महत्त्वाची ओळख आहे. या परिसरातील नागरिक श्रद्धाळू असल्याने गावात मंदिर नसल्याची खंत सर्वांना वाटत होती. कुकशेतमध्येही देवाचे भव्य मंदिर उभारावे. जुन्या मंदिरातून सर्व देवांच्या मूर्ती विधिवत या ठिकाणी आणल्या जाव्यात, अशी मागणी ग्रामस्थ अनेक वर्षांपासून करीत होते. त्यानुसार हस्तांतर केलेल्या भूखंडावर शनिवारी माजी खासदार संजीव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
कुकशेतमधील मंदिराचे काम सुरू
By admin | Published: April 04, 2016 2:12 AM