मेट्रोच्या तिन्ही टप्प्यांचे काम एकाच वेळी, सिडकोचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 04:40 AM2018-09-26T04:40:18+5:302018-09-26T04:40:35+5:30
कंत्राटदाराच्या नियुक्तीअभावी नवी मुंबई मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम रखडले आहे; परंतु आता पहिल्या टप्प्याबरोबरच उर्वरित तिन्ही टप्प्यांचे काम एकाच वेळी पूर्ण करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.
- कमलाकर कांबळे
नवी मुंबई : कंत्राटदाराच्या नियुक्तीअभावी नवी मुंबईमेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम रखडले आहे; परंतु आता पहिल्या टप्प्याबरोबरच उर्वरित तिन्ही टप्प्यांचे काम एकाच वेळी पूर्ण करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्या दृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी ‘लोकमत’ला दिली.
सिडकोने २०११ मध्ये नवी मुंबई मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. तीन टप्प्यांत हा मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. त्यासाठी चार हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यापैकी बेलापूर-खारघर-तळोजा-पेंधर या ११ कि.मी. लांबीच्या पहिल्या टप्प्याचे काम मागील पाच वर्षांपासून सुरू आहे. मात्र, विविध कारणांमुळे या कामाची गती मंदावली आहे.
पहिल्या टप्प्याचे काम रखडल्याने उर्वरित दोन टप्पेसुद्धा रखडले आहेत, त्यामुळे प्रकल्पाचा खर्च वाढला आहे. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या कामाने वेग घेतला आहे. डिसेंबर २०१९ पर्यंत या विमानतळावरून विमानाचे टेकआॅफ होईल, असा विश्वास सिडकोला वाटतो आहे. त्यादृष्टीने कामालाही गती देण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे मेट्रो प्रकल्पाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण तीन टप्प्याच्या माध्यमातून मेट्रो थेट विमानतळाला जोडली जाणार आहे. मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी मे २०१९ ची डेडलाइन देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचा विमानतळाला काहीच उपयोग होणार नाही.
उर्वरित दोन टप्प्याचे काम पूर्ण झाल्याशिवाय मेट्रोची व्यवहार्यता सिद्ध होणार नाही. ही बाब ओळखून पहिल्या टप्प्याबरोबरच उर्वरित दोन टप्प्याच्या कामालाही गती देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. हे काम तांत्रिकदृष्ट्या अडचणीचे असले तरी ते गरजेचे आहे. त्या दृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती लोकेश चंद्र यांनी दिली. कंत्राटदार नियुक्त करण्याची प्रक्रियासुद्धा सुरू करण्यात आली आहे. संचालक मंडळाच्या मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
मेट्रो प्रकल्पाच्या तीन टप्प्यांचा तपशील
बेलापूर ते पेंधर या पहिल्या टप्प्याच्या ११ कि.मी. लांबीच्या मार्गासाठी सुरुवातीच्या काळात दोन हजार कोटी रुपये खर्च अंदाजित करण्यात आला होता. दुसरा टप्पा ८.३५ कि.मी. लांबीचा आहे. तळोजा एमआयडीसी-कळंबोली-खांदेश्वर मार्गे आंतरराष्ट्रीय विमानतळाला हा मार्ग जोडला जाणार आहे. त्यासाठी सुमारे दीड हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. पहिल्या दोन टप्प्यांना जोडण्यासाठी तिसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. हा टप्पा केवळ दोन कि.मी. लांबीचा असून, त्यासाठी ५७४ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे; परंतु पहिलाच टप्पा पाच वर्षे रखडल्याने उर्वरित दोन टप्प्यांचे कामही लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या एकूण खर्चात दुपटीने वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
नवी मुंबई मेट्रोचा विस्तार कल्याणपर्यंत करण्याची सिडकोची योजना आहे.त्यादृष्टीने यापूर्वीच कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. बेलापूर ते पेंधर (तळोजा) हा मेट्रोचा पहिला टप्पा आहे. पहिल्या टप्प्याचा कल्याणपर्यंत विस्तार करण्याची योजना आहे. हे अंतर २३ किमी लांबीचे आहे. तळोजा येथून तीन किमी लांबीपर्यंत एमआयडीसीच्या सहयोगाने तर पुढील वीस किमी लांबीचा मार्ग एमएमआरडीएच्या सहकार्याने पूर्ण करण्याचा सिडकोचा प्रस्ताव आहे. नवी मुंबई मेट्रोचा कल्याणपर्यंत विस्तार झाल्यास त्या भागातील चाकरमान्यांना आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत जलद प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.