नवी मुंबई : पालिका रुग्णालयाच्या इमारतीवरून पडून कामगाराच्या मृत्यूची घटना घडली आहे. मृत्यू झालेला कामगार कंत्राटी कामगार असून कोणत्याही सुरक्षेच्या साधनाविना तो दुसऱ्या मजल्यावर चढला होता. घटनेची माहिती मिळताच स्वराज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेऊन घडलेल्या घटनेप्रकणी प्रशासनाला धारेवर धरले.मुकेश कुमार (25) असे दुर्घटनेत मृत पावलेल्या कामगाराचे नाव आहे. तो ठेकेदार मार्फत रुग्णालयात प्लम्बिंगचे काम करायचा. रविवारी सकाळी तो इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील मोकळ्या भागातील पत्र्यावर गेला होता. त्यावेळी पत्रा फुटून तो खाली कोसळला असता गंभीर जखमी होऊन मृत पावला. घटनेनंतर शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मुकेशकुमार हा ठेकेदार मार्फत नियुक्त असताना रुग्णालयातच रहायला होता असे समजते. तर रविवारी कोणतेही काम नसताना तो पत्र्यावर गेला होता असे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यावेळी तो पत्र्यावरून चालत असताना पत्रा फुटून तो खाली कोसळला असता त्याचा मृत्यू झाला.
या घटनेवरून स्वराज्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हाध्यक्ष उमेश जुनघरे, नितीन पवार, प्रशांत मिसाळ, स्वप्नील बेलोसे, विनायक जाधव आदींनी रुग्णालयात धाव घेतली. रविवारी सुट्टी असताना कामगार पत्र्यावर कशासाठी गेला ? असा प्रश्न उपास्थीत करत संबंधित दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी स्वराज्य पक्षाने केली आहे. तसेच हि दुर्घटना आहे कि घातपात याचीही पोलिसांमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान रात्री उशिरापर्यंत वाशी पोलिसांकडून या घटनेच्या अनुशंघाने रुग्णालयात चौकशी सुरु होती.