उरण : जेएनपीटी बंदरातील कामगारांना याआधी देण्यात येणाऱ्या अमर्याद मेडिक्लेम रकमेवर प्रशासनाने निर्बंध आणले आहेत. १ मेपासून कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी वर्षभरात फक्त पाच लाखांपर्यंत कॅशलेस मेडिक्लेम तरतुदीची अंमलबजावणी करण्याचा फतवा जेएनपीटीने जारी केला आहे. जेएनपीटी प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात कामगारांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.जेएनपीटी कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना प्रशासनाकडून अमर्याद मेडिक्लेम रकमेची सुविधा होती. कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्यासाठी जेएनपीटीच्या पॅनलवर असलेल्या मुंबई, नवी मुंबईतील मोठ्या रुग्णालयात उपचाराचा लाभ मिळत होता. कामगारांना मेडिक्लेमवर वर्षाकाठी १२ ते १५ कोटी रुपयांपर्यंत खर्च होत आहेत. त्याशिवाय काही कामगारांकडून मेडिक्लेमची चुकीची बिले देवून जेएनपीटीची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला जात असल्याचाही प्रशासनाचा दावा आहे. कामगारांच्या मेडिक्लेमवर होणारा खर्च जादा असल्याचा दावा करीत जेएनपीटीने अमर्याद मेडिक्लेमच्या रकमेवर प्रशासनाने निर्बंध आणले आहेत. १ मेपासून कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी वर्षभरात पाच लाखांपर्यंत कॅशलेस मेडिक्लेमच्या तरतुदीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय जेएनपीटीने घेतला आहे. जेएनपीटीच्या फतव्यामध्ये ओपीडीसाठी विविध श्रेणीतील कामगार आणि अधिकाऱ्यांसाठी एक ते दोन लाखांपर्यंत वार्षिक रकमेची तरतूदही केली आहे. मात्र ओपीडीमध्ये तरतूद करण्यात आलेल्या दोन लाखांपर्यंतच्या रकमेचा पाच लाखांत समावेश आहे की नाही याबाबत कामगार आणि अधिकाऱ्यांमध्येही संभ्रमाचे आहे. कामगारांसाठी आणखी काही मेडिक्लेम सुविधा देण्याचा जेएनपीटीचा मानस असला तरीही कामगारांचा जेएनपीटी प्रशासनाच्या मेडिक्लेम रकमेवर मर्यादा आणण्याच्या निर्णयाला विरोध असल्याची माहिती जेएनपीटी वर्कर्स युनियन सचिव रवींद्र पाटील यांनी दिली. (वार्ताहर)
मेडिक्लेमच्या निर्णयाने कामगार संतप्त
By admin | Published: April 26, 2017 12:30 AM