श्रमिक साहित्य संमेलनात कष्टकऱ्यांच्या कलेचा जागर
By नामदेव मोरे | Published: April 30, 2024 08:36 PM2024-04-30T20:36:08+5:302024-04-30T20:36:53+5:30
युवा सामाजिक संस्थेचे आयोजन; बांधकाम मजूर, फेरीवाले घरेलू कामगारांचा सहभाग.
नवी मुंबई: कष्टकरी असंघटित कामगारांना त्यांच्यातील कला व साहित्यिक गुणांना व्यासपिठ मिळवून देण्यासाठी खारघरमधील युवा सामाजिक संस्थेने दुस-या श्रमीक सांस्कृतिक साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. यामध्ये बांधकाम मजूर, फेरीवाले , घरेलू कामगारांनी त्यांच्यातील कलेचा जागर केला. हक्कांसाठी संघटीत होवून लढा देण्याचा संकल्प केला.
खारघर सेक्टर ७ मधील युवा सेंटर मध्ये कामगार दिनाच्या पाश्र्वभूमीवर हे संमेलन आयोजित केले होते. दिवसभर चार सत्रात झालेल्या संमेलनात सहभागी कलाकार व कष्टकरी कामगारांनी चळवळीती गाणी सादर केली. कामगार दिनाचे महत्व, मुंबईतील गिरणी कामगारांचा सर्वात मोठा संप, कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे, अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची माहिती फलकांच्या माध्यमातून ओळख करून देण्यात आली. अनेक नामांकित कलाकारांनी गोंधळ, वासुदेव व इतर पारंपरिक लोकगिते सादर केली. पोवाडे, कविता सादर केल्या. कामगारांनीही खड्या आवाजात कविता व चळवळीतील गितांचे सादरीकरण केले.
शाहीर संभाजी भगत यांनी सादर केलेल्या हिटलर के साथी ला कष्टक-यांनीच दाद दिली. असंघटित कामगारांनी संघटीत होऊन लढा देण्याचे आवाहन केले. घर हक्क समितीचे हिरामन पगार यांनी युवा संस्थेने कष्टक-यांचे जीवन सुरक्षित करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. प्रयास चे आशिष शिगवन यांनीही मार्गदर्शन केले, अप्पासाहेब उगले, रामानंद उगले व सहका-यांनी लोकला सादर केल्या. कामगारांनी त्यांच्या कलेचे सादरीकरण केले व लेझीम च्या तालावर फेर धरला.
युवा संस्था ४० वर्षांपासून कष्टकरी बांधकाम मजूर, घरकाम कामगार व फेरीवाल्यांच्या प्रश्नांवर काम करत आहे. दोन वर्षांपासून श्रमीक सांस्कृतिक साहित्य संमेलन सुरू केले असून दुस-या वर्षीही उत्तम प्रतिसाद मिळाला.
ॲड.सुजीत निकाळजे, युवा संस्था
कामगारांना हक्काचे व्यासपीठ
कामगार दिनाच्या एक दिवस अगोदर आयोजित या संमेलनात कष्टकरी कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये महिला कामगारांची उपस्थिती उल्लेखनीय होती. युवा संस्थेने व्यासपिठ मिळवून दिल्याबद्दल सर्वांनी ॠण व्यक्त केले.