‘बीपीसीएल’ कामगारांचे १२ तास कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 05:51 AM2018-12-13T05:51:23+5:302018-12-13T05:51:42+5:30
कामावर असताना कामगाराचा मृत्यू : वारसाला नोकरी, भरपाईसाठी मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार
उरण : भेंडखळ-बोकडवीरा हद्दीत बीपीसीएल कंपनीच्या गॅस भरण्याच्या प्रकल्पात मंगळवारी मध्यरात्री दयानंद ठाकूर (५५) या रात्रपाळीतील कामगाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, पण मृत कामगाराच्या वारसाला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याच्या मागणीसाठी कामगारांनी मध्यरात्रीपासूनच ‘कामबंद’ आंदोलन सुरू केले होते. यामुळे मध्यरात्रीपासून बीपीसीएल प्रकल्पाचे कामकाज १२ तास बंद पडले होते.
उरण येथे भेंडखळ-बोकडवीरा हद्दीत बीपीसीएल प्रकल्प आहे. दररोज सुमारे पाच हजार सिलिंडर आणि शेकडो गॅस टँकर भरून देशभरात वितरित केले जातात. या प्रकल्पात मंगळवारी मध्यरात्री दयानंद ठाकूर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनास शासकीय इंदिरा गांधीरुग्णालयात नेण्यात आला, पण मृत कामगाराच्या वारसाला अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याच्या मागणीसाठी कामगारांनी मध्यरात्रीपासूनच ‘कामबंद’ आंदोलन सुरू केले होते, तसेच मृतदेह ताब्यात घेण्यास कामगारांसह त्यांचे कुटुंबीयही राजी नव्हते. यामुळे १२ तास मृतदेह रुग्णालयातच पडून होता. वारसाच्या नोकरीचा प्रश्न निकाली निघत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याच्या भूमिकेवर कामगार अडून बसले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांचीही तारांबळ उडाली होती. परिणामी, या प्रकल्पातील कामकाज तब्बल बारा तास बंद पडल्याचे सांण्यात आले.
तब्बल सहा तास मॅरेथॉन चर्चा
कामगारांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यास बुधवारी सकाळपासूनच शिवसेना आमदार तथा जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली, बीपीसीएल अधिकाºयांबरोबर तब्बल सहा तास मॅरेथॉन चर्चा सुरू होती. या चर्चेत मृत कामगाराच्या वारसाला नोकरी देण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस पत्र पाठविण्याचे, तसेच मरण पावलेल्या कामगाराला मिळणाºया ६० ते ६५ लाखांच्या लाभाव्यतिरिक्त आणखी अतिरिक्त सुमारे ४० लाख मिळून, एकूण एक कोटी पाच लाखांची रक्कम देण्याचे बीपीसीएलने मान्य केले आहे. बीपीसीएल अधिकाºयांनी दिलेल्या ठोस आश्वासनानंतर, १२ तासांनंतरच बंद मागे आणि मृतदेह ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आमदार मनोहर भोईर यांनी दिली.