कामगारांचे ‘भविष्य’ टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2015 02:23 AM2015-07-07T02:23:51+5:302015-07-07T02:23:51+5:30

महापालिकेच्या घनकचरा विभागातील कंत्राटी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीत घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. अनेक कामगारांच्या नावावर पैसे नियमित भरण्यात आलेले नाहीत

Workers 'future' hangover | कामगारांचे ‘भविष्य’ टांगणीला

कामगारांचे ‘भविष्य’ टांगणीला

Next

नवी मुंबई : महापालिकेच्या घनकचरा विभागातील कंत्राटी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीत घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. अनेक कामगारांच्या नावावर पैसे नियमित भरण्यात आलेले नाहीत. हयात असलेल्या कामगारांचे भविष्य अंधारात असताना ज्यांचे निधन झाले आहे, अशा कामगारांच्या नावावर तीन वर्षे पैसे भरल्याचे उघडकीस आले आहे.
महापालिकेला स्वच्छता अभियानामध्ये तीन वेळा प्रथम क्रमांक मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या साफसफाई कामगारांची ठेकेदाराकडून पिळवणूक होऊ लागली आहे. कामगारांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम वेळेवर संबंधित विभागाकडे जमा केली जात नाही. अनेक कामगारांची पी.एफ.ची रक्कम भरलेलीच नाही तर काहींची कमी भरली आहे.
काही कामगारांची रक्कम दोन ते तीन वर्षांनंतर भरली आहे. भविष्यनिर्वाह निधीमध्ये घोटाळा झाला असून, त्याची चौकशी करण्यासाठी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने घनकचरा विभागाचे उपआयुक्त बाबासाहेब राजळे
यांना घेराव घातला. ज्या कामगारांचे पैसे भरले नाहीत त्यांची माहिती
दिली. शिवसैनिकांनी व कामगारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे
देताना अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली.
एका महिला कर्मचाऱ्याने तीन ठेकेदारांकडे काम केले. निवृत्ती घेतल्यानंतर तिला भविष्यनिर्वाह निधीची रक्कमच मिळाली नसल्याचे निदर्शनास आले आहे. सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा पगार बँकेत जमा न करता रोख स्वरूपात दिला जात असून त्यांचाही पी. एफ. भरला जात नाही.
नेरूळ शिवाजीनगरमध्ये काम करणाऱ्या विजय राठोड या कामगाराचा तीन वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. मृत्यूनंतर दोन महिन्यांमध्ये त्या जागेवर त्याची पत्नी रुजू झाली आहे. मृत्यूनंतरही तीन वर्षे विजय यांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम भरण्यात आली असल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु काम करत असलेल्या त्याच्या पत्नीची रक्कम मात्र भरली जात नसल्याचे उघडकीस आले आहे. याबद्दल विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. भविष्यनिर्वाह निधीमधील घोटाळ्याची सखोल चौकशी झाली पाहिजे.
ज्या कामगारांच्या खात्यात एक लाखापेक्षा जास्त रक्कम असणे अपेक्षित आहे, त्यांच्या नावावर २५ ते ३० हजार रुपये जमा असल्याचे त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. ज्या ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे घोटाळा झाला आहे, त्यांची सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे लेखी आश्वासन देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाने लेखी उत्तर दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी नगरसेवक शिवराम पाटील, संजू वाडे, सोमनाथ वास्कर, सरोज पाटील, भारती कोळी, ऋचा पाटील, सुवर्णा सपकाळ, दीपाली सकपाळ, रामदास पवळे, ममित चौगुले, चेतन नाईक,रतन मांडवे, विशाल ससाणे,जगदीश गवते, महेश कोठीवाले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Workers 'future' hangover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.