नामदेव मोरे, नवी मुंबईशहराची साफसफाई करणारे व कचरा उचलणाऱ्या कामगारांचे जीवन कष्टमय झाले आहे. दिवसभर कचऱ्यात काम केल्यामुळे अनेकांना गंभीर आजार झाले आहेत. अनेकांचे अकाली निधन झाले आहे. कष्टकऱ्यांच्या आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असून, आतापर्यंत एकदाही सर्व कामगारांची संपूर्ण आरोग्य तपासणी झालेली नाही. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. सिंगापूरप्रमाणे शहराला वैभव प्राप्त करून देण्याच्या वल्गना नेते व अधिकारी अनेक वेळा असतात. परंतु सफाई कामगारांचे राहणीमान सुधारावे याकडे मात्र कोणीच लक्ष देत नाही. धुळीमुळे अनेकांना क्षयरोग, दमा व इतर आजार झाले आहे. कचरा उचलणारे कामगार कचऱ्याच्या गाडीमध्ये उभे राहिलेल्याचे अनेक ठिकाणी दिसते. गुडघाभर कचऱ्यात उभे राहून काम करावे लागते. कचराकुंडीच्या आजूबाजूला कचरा पडलेला असतो. तो उचलून गाडीत टाकावा लागतो. गमबुट, मोजे, मास्क या अत्यावश्यक वस्तू दिल्या जात नाहीत. परंतु यापूर्वी वर्षानुवर्षे कोणत्याही सुविधेविना कामगार कचरा उचलण्याचे काम करत आहेत. अनेक कामगारांचे अकाली निधन झाले आहे. अनेकांच्या वारसांना नोकरी देऊन उत्तरदायित्व संपविण्यात आले आहे. परंतु कामगाराचा मृत्यू नक्की का झाला याचे कारण शोधण्याचा कोणीच प्रयत्न केलेला नाही. अनेकांना दारूचे व्यसन लागले आहे. दिवसाचे ५ ते ८ तास श्वास घेण्यासही त्रास होत असलेल्या कचऱ्यात राहिल्यामुळेच ही व्यसने लागली आहेत, याकडे मात्र सर्वजण दुर्लक्ष करत आहेत. आरोग्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, सर्व कंत्राटी कामगारांची किमान वर्षातून एकदा पूर्णपणे शारीरिक तपासणी करण्यात यावी, अशी मागणी कामगार व्यक्त करत आहेत.
कामगारांचे आरोग्य धोक्यात
By admin | Published: July 10, 2015 3:01 AM