माथाडी रुग्णालयावर कामगारांंची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 02:12 AM2017-10-07T02:12:31+5:302017-10-07T02:12:40+5:30
डेंग्यूच्या उपचारासाठी माथाडी कामगार रुग्णालयात दाखल असलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली.
नवी मुंबई : डेंग्यूच्या उपचारासाठी माथाडी कामगार रुग्णालयात दाखल असलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचा महिलेच्या नातेवाइकांचा आरोप आहे. यामुळे संतप्त माथाडी कामगारांनी रुग्णालयाला घेराव घालून दोषींवर कारवाईसह बंद करण्याची मागणी केली.
चंद्रभागा पवार (३८), असे मयत महिलेचे नाव आहे. कोपरखैरणे सेक्टर ६ येथे राहणाºया चंद्रभागा पवार यांना कोपरखैरणेतील माथाडी कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते; परंतु चंद्रभागा यांची प्रकृती चिंताजनक असतानाही डॉक्टरांकडून दुर्लक्ष केले जात होते. तर नातेवाइकांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांकडे चौकशी केल्यास त्यांनाही उडवाउडवीची उत्तरे मिळायची, असा आरोप चंद्रभागा पवार यांचे भाऊ शिवाजी राजीवडे यांनी केला आहे. गुरुवारी चंद्रभागा यांच्या पोटात जास्त दुखून त्रास असह्य होत असताना, परिचारिकांनी त्यांनाच दमदाटी करून शांत राहायला सांंगितले. शिवाय, केलेली उलटीही त्यांच्याच नातेवाइकांना साफ करायला लागली. मात्र, शुक्रवारी सकाळी त्यांची प्रकृती जास्त खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करताच, काही मिनिटांतच त्यांचा मृत्यू झाला. या वेळी चंद्रभागा यांना डेंग्यूची लागण होऊन पेशी कमी झाल्या होत्या, असा उलगडा झाला. मात्र, जर त्यांच्या पेशी कमी झाल्या होत्या, तर वेळीच त्यांच्यावर योग्य उपचार का झाले नाहीत, शिवाय ही बाब आपल्यापासून का लपवली, याचा जाब नातेवाइकांनी डॉक्टरांना विचारला. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने व यापूर्वीही माथाडी कामगार रुग्णालयात रुग्णांच्या जीवासोबत असे खेळ झालेले असल्याचा आरोप करत, संतप्त माथाडी कामगारांनी रुग्णालयाला घेराव घातला. कामगारांच्या हितासाठी सुरू केलेले रुग्णालयच त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवावर उठले असल्याचा आरोप करत, रुग्णालय बंद करण्याची मागणी केली. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी माथाडी नेते आमदार नरेंद्र पाटील, सहायक आयुक्त प्रदीप जाधव, वरिष्ठ निरीक्षक भरत कांबळे, अजयकुमार लांडगे, राजेंद्र गलांडे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित झाले होते. अखेर आमदार पाटील, रुग्णालय व्यवस्थापन व मयत चंद्रभागा पवार यांच्या कुटुंबीयांमध्ये झालेल्या बैठकीत, दोषी डॉक्टरांना निलंबित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, नातेवाइकांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून तो ताब्यात घेण्याची तयारी दर्शवली.
माथाडी रुग्णालयासंदर्भात बैठक
माथाडी कामगार रुग्णालयात रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. नव्या रुग्णालयाची इमारत तयार असूनही त्याचा पूर्णपणे वापर होत नाहीये. शिवाय रुग्ण व नातेवाइकांना कर्मचाºयांकडून योग्य वागणूक मिळत नाही. त्यामुळे ज्या कामगारांच्या पगारातून रक्कम कपात होऊन रुग्णालय चालते, त्यांनाच जर त्याचा उपयोग होत नसेल तर रुग्णालय बंद करावे, अशी मागणी संतप्त कामगारांनी केली. त्यामुळे भविष्यात माथाडी रुग्णालय सुरू ठेवायचे की नाही, यासंदर्भात सोमवारी संबंधित सर्व घटकांची बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार आहे.
चंद्रभागा पवार यांच्या निधनाची सखोल चौकशी केली जाणार आहे. तूर्तात दोन्ही दोषी डॉक्टरांना निलंबित करण्याचा निर्णय झाला असून, ते पुन्हा या रुग्णालयात काम करणार नाहीत, याची दखल घेतली जाईल. तसेच उपचारात हलगर्जीपणा खपवला जाणार नसल्याचे आमदार नरेंद्र पाटील यांनी सांगितले.