रेप्रोमधील कामगारांचे आंदोलन सुरूच
By admin | Published: May 12, 2017 01:57 AM2017-05-12T01:57:19+5:302017-05-12T01:57:19+5:30
नियमित पगारवाढ मिळावी, महागाई भत्ता व इतर मागण्यांसाठी रेप्रो इंडिया लिमिटेड कंपनीमधील २८४ कामगारांनी ८ एप्रिलपासून
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नियमित पगारवाढ मिळावी, महागाई भत्ता व इतर मागण्यांसाठी रेप्रो इंडिया लिमिटेड कंपनीमधील २८४ कामगारांनी ८ एप्रिलपासून आंदोलन सुरू केले आहे. उपोषणानंतरही व्यवस्थापनाने अद्याप मागण्या मान्य केल्या नसून आंदोलन दडपण्याचा हालचाली सुरू झाल्या असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.
महापेमधील रेप्रो इंडिया कंपनीमध्ये २८४ कामगार जवळपास २२ वर्षांपासून काम करत आहेत. कंपनी व्यवस्थापन कामगारांचे प्रश्न सोडविण्याकडे लक्ष देत नसल्याने कामगारांनी राजन राजे यांच्या धर्मराज्य कामगार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारून ८ एप्रिलपासून आंदोलन सुरू केले आहे. कामगार न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयाने नवीन कामगार भरती, कच्चा माल, मशिनरी स्थलांतरास स्थगिती दिली आहे. परंतु कंपनी खासगी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने कच्चा माल बाहेर काढत आहे. याशिवाय कंत्राटी कामगारांकडून काम करून घेतले जात आहे. संप मोडीत काढण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप केला आहे.
कामगार आयुक्तांकडून दोन वेळा व्यवस्थापनाला चर्चेसाठी आमंत्रण देण्यात आले आहे. परंतु एकदाही व्यवस्थापनाकडून कोणीही चर्चेसाठी उपस्थित राहिलेले नाही. कामगारांनी वारंवार पत्रव्यवहार करूनही काहीही मार्ग काढला जात नसल्याने कामगारांनी नाराजी व्यक्त केली असून आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे.