कामगारांच्या शेडला टाळे

By Admin | Published: July 9, 2015 01:13 AM2015-07-09T01:13:34+5:302015-07-09T01:13:34+5:30

शहरातील कंत्राटी कामगारांच्या सुविधेसाठी महापालिकेने प्रत्येक नोडमध्ये निवारा शेड (कंटेनर बॉक्स) तयार केले आहेत.

Workers' sheds | कामगारांच्या शेडला टाळे

कामगारांच्या शेडला टाळे

googlenewsNext

नामदेव मोरे, नवी मुंबई
शहरातील कंत्राटी कामगारांच्या सुविधेसाठी महापालिकेने प्रत्येक नोडमध्ये निवारा शेड (कंटेनर बॉक्स) तयार केले आहेत. कामगारांना त्यांचे साहित्य ठेवता यावे, जेवणाच्या वेळेत थांबता यावे यासाठी लाखो रुपये खर्च करून ही सुविधा निर्माण केली आहे. परंतु बहुतांश शेडना कायमस्वरूपी टाळे लावून ठेवण्यात आले असून, कामगारांना स्वत: किंवा ठेकेदारांनी झोपडीवजा तयार केलेल्या शेडचा आश्रय घ्यावा लागत आहे.
देशातील सर्वात भव्य मुख्यालय बनविणाऱ्या महापालिकेला शहराची साफसफाई करणाऱ्या कामगारांच्या सुविधांचा विसर पडला आहे. इतर शहरांप्रमाणेच येथील कामगारांनाही गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. शहरात एकूण ५०७५ सफाई कामगार आहेत. त्यामध्ये २४३७ कामगार घनकचरा व्यवस्थापन विभागात काम करत आहेत. दिघा ते बेलापूर व औद्योगिक वसाहतीमधील १६२ चौरस किलोमीटर विभागातील रस्ते व इतर ठिकाणची साफसफाई करण्याची जबाबदारी या कामगारांवर आहे. कामगारांनी केलेल्या कामामुळेच महापालिकेस आतापर्यंत तीन वेळा स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला आहे. कामगार सकाळी ८ ते दुपारी तीन वाजेपर्यंत सफाईचे काम करत असतात. कामगारांना त्यांचे साहित्य ठेवण्यासाठी, दुपारी जेवणाच्या सुटीमध्ये जेवण करण्यासाठी निवारा शेडच नाहीत. काही ठिकाणी ठेकेदारांनी पत्र्याच्या झोपडीवजा शेड तयार केल्या आहेत. परंतु त्यामध्ये पाणी, वीज, शौचालय यापैकी कोणतीच सोय नाही. यामुळे कामगारांची प्रचंड गैरसोय होत आहे. जेवणाआधी हात धुण्यासाठी व कामावरून घरी जाताना हात - पाय धुऊन कपडे बदलण्यासाठीही जागा नाही.
कामगारांची गैरसोय दूर करण्यासाठी महापालिकेने हजेरी शेडच्या नावाने निवारा शेड उभारण्याचा निर्णय घेतला. लाखो रुपये खर्च करून प्रत्येक विभागात कंटेनर बॉक्सप्रमाणे निवारा शेड बसविले आहेत. या शेडमध्ये साहित्य ठेवण्यासाठी जागा, महिलांसाठी चेजिंग रूम, शौचालय, पाणी, वीज या सुविधा देण्यात येणार होत्या. परंतु निवारा शेड बसवून एक वर्ष झाले तरी अद्याप त्यांचा वापर सुरू करण्यात आलेला नाही. काही ठरावीक ठिकाणचे शेड सुरू आहेत. सानपाडा स्टेशन, नेरूळ, वाशी, बेलापूरमधील शेड बंदच आहेत. कामगारांची गैरसोय सुरूच आहे. कंत्राटी कामगारांना बेघर नागरिकांप्रमाणे पत्र्याच्या व प्लास्टिकच्या सहाय्याने तयार केलेल्या शेडमध्येच राहावे लागत आहे. कचरा साफ करणारे हात नीट न धुताच जेवण केल्यामुळे कामगारांच्या पोटात जंतू जात आहेत. प्रसाधनगृहांची सोय नसल्यामुळे पोटाचे विकार होऊ लागले आहे. परंतु या समस्येकडे ठेकेदार, प्रशासनासह सर्वच दुर्लक्ष करत आहेत.

वास्तव पाहण्याचे आवाहन
च्निवारा शेड नसल्यामुळे कामगारांची प्रचंड गैरसोय होत आहे. महापौर व इतर राजकीय प्रतिनिधींसह आयुक्तांनी प्रत्यक्षात निवारा शेड पहावे. कामगार कोणत्या स्थितीमध्ये जेवतात, अस्वच्छतेमुळे त्यांच्या आरोग्याची किती हेळसांड होते, याची माहिती घेतली तर कामगारांना किती वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे हे लक्षात येईल, अशी प्रतिक्रिया कामगार व्यक्त करत आहेत.

महिलांची गैरसोय; प्रशासनाला गांभीर्यच नाही
१हजेरी शेड नसल्यामुळे महिलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. शहरात अनेक विभागांमध्ये सार्वजनिक प्रसाधनगृहसुद्धा नाहीत. अनेक महिलांना पोटाचे व इतर आजार होऊ लागले आहेत. महापालिका प्रशासनाने या समस्येकडे कधीच गांभीर्याने पाहिलेले नाही.

२प्रशासनाने माणुसकीच्या दृष्टीने चांगले निवारा शेड तयार करावे व त्याचा कामगारांना वापर करू द्यावा, अशी मागणी केली जात आहे. पालिका मुख्यालयात कामगारांना अत्याधुनिक कँटीन, अत्याधुनिक प्रसाधनगृह आहे पण रस्त्यावर काम करणाऱ्यांचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महापालिकेने प्रत्येक विभागात अद्ययावत निवारा शेड बसविले आहेत. परंतु बहुतांश शेड बंद आहेत. कामगारांना पत्र्याच्या शेडमध्ये साहित्य ठेवावे लागत आहे. दुपारी जेवण करताना पिण्यासाठी, हात धुण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. कामावरून जाताना हात - पाय धुता येत नाहीत. प्रसाधनगृहांचीही सोय नसल्यामुळे कामगारांची गैरसोय होत असून या समस्येकडेही गांभीर्याने पाहिले जात नाही.
- गजानन भोईर, अध्यक्ष - समाज समता कामगार संघ, नवी मुंबई

Web Title: Workers' sheds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.