कामगारांना आर्थिक साहाय्य मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 12:20 AM2020-07-29T00:20:30+5:302020-07-29T00:20:35+5:30
विमा संरक्षण देण्याचेही आश्वासन : रेल्वेने प्रवास करण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : लॉकडाऊनच्या काळात माथाडी कामगारांच्या रोजगारावरही परिणाम झाला आहे. आर्थिक संकटातून दिलासा देण्यासाठी सर्व कामगारांना राखीव निधीतून पाच हजार रुपये आर्थिक साहाय्य करण्याच्या सूचना माथाडी मंडळांना करण्यात आल्या आहेत. कामगारांना विमा संरक्षण व रेल्वेने प्रवास करण्यासाठी क्यूआर कोड ई-पास देण्याचा निर्णयही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला माथाडी नेते आमदार शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील, सुरक्षारक्षक युनियनचे अजिंक्य भोसले उपस्थित होते. मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती, गॅस सिलिंडर कंपन्या, खत कारखाने, रेल्वे धक्का व इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामगार काम करत आहेत. माथाडी कामगार व सुरक्षारक्षकांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे प्रवास करण्याची परवानगी मिळावी. काम करताना कोरोनाची लागण झाल्यास त्यांना विमा संरक्षण मिळावे, अशी मागणी कामगार नेत्यांनी बैठकीत केली. उपमुख्यमंत्र्यांनीही कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली. माथाडी कामगार व सुरक्षारक्षकांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून त्यांना विमा संरक्षण देण्यात येईल. कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी क्यूआर कोड ई-पास देण्याची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
मार्च महिन्यापासून अनेक माथाडी कामगारांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. अनेक कंपन्या बंद आहेत.
पत्र पाठवून दिली निर्णयाविषयी माहिती
च्सुरू असलेल्या कंपन्यांचा व्यवसाय कमी झाला आहे. यामुळे कामगारांना घरखर्च भागविणे अवघड झाले आहे. माथाडी मंडळांनी त्यांच्या राखीव निधीमधून पाच हजार रुपये आर्थिक साहाय्य देण्याचा निर्णयही घेतला आहे. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने कामगार आयुक्त व माथाडी मंडळांच्या अध्यक्षांना पत्र पाठवून निर्णयाविषयी माहिती दिली.