नवी मुंबई : दैनंदिन जीवनात समाज माध्यमांचा काळजी पूर्वक वापर कसा करावा, इंटरनेट विषयक सुरक्षा कशी बाळगावी, सोशल मिडियावरुन धोके कसे ओळखावे या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी कोकण विभागीय माहिती कार्यालयातर्फे बुधवारी “सोशल मिडिया आणि आधुनिक सुरक्षा ” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोकण विभागातील समाज माध्यमांशी संबधित काम पाहणारे कर्मचारी व अधिकारी तसेच कोकण भवन येथील कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बँकिंग सायबर सिक्युरिटी तज्ञ विकास पाटील व प्रशांत पाटील यांनी स्मार्ट फोन वापरतांना काळजी कशी घ्यावी, पासवर्ड बद्दल सुरक्षितता कशी बाळगावी. तसेच इंटरनेट माध्यमांतून होणारी फसवणूक, सोशल मिडियावरील खोटी प्रलोभने आणि खोटी अमिषे कशी ओळखावी या बद्दल पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे सादरीकरण करुन तपशीलवार माहिती दिली. संगणक आणि मोबाईलचा उपयोग करतांना सुरक्षितता असणे कसे आवश्यक आहे. याबाबतही माहिती त्यांनी दिली.
कार्यशाळेच्या प्रारंभी कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे यांनी प्रस्ताविक भाषणात कार्यशाळेचे महत्व सांगितले. डॉ.मुळे म्हणाले की, आज सर्व वयोगटातून दैनंदिन जीवनात समाज माध्यमांचा सर्रास वापर होतो आहे. आज प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहे. परंतू या स्मार्ट फोनमधील बरेचशे तंत्रज्ञान आपल्याला माहिती नसते. मोबाईल बॅंकिंगचा वापर वाढला आहे. युपीआय, जीपे, पेटीएम, फोन पे सारख्या आर्थिक व्यवहाराच्या ॲपचा मोठया प्रमाणात वापर वाढला आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन आर्थिक फसवणूकीचे प्रमाणही वाढले आहे. या सर्व गोंष्टीची माहिती समजून घेण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा दैनंदिन जीवनात उपयोग होईल, असा विश्वास डॉ.मुळे यांनी यावेळी व्यक्त केला.
या कार्यशाळेचे सूत्रसंचलन कोकण विभागीय माहिती कार्यालयाच्या सहाय्यक संचालक संजीवनी जाधव- पाटील यांनी केले. ऑनलाईन प्रशिक्षण सत्रासाठी विभागात समन्वयाचे काम उपसंपादक प्रविण डोंगरदिवे यांनी पाहिले. यावेळी कार्यशाळेत उपस्थितांनी त्यांना प्रत्यक्ष कामात येणाऱ्या अडचणीबाबत प्रश्नोत्तरे केली.