नवी मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील नऊ महापालिकांसह अंबरनाथ-बदलापूर नगरपालिका ते कर्जत-कसारापर्यंतच्या परिसरातील सर्व प्रकारच्या वाहतूक सुविधा आणि येणारे विकास प्रकल्प लक्षात घेऊन एमएमआरडीएने आता परिवहन केंद्रित शाश्वत विकासावर भर दिला आहे. यासाठी ४०० स्थानकांसह त्या परिसराचा जागतिक बँकेच्या मदतीने चेहरामोहरा बदलून विकास करून पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.
यात विस्तीर्ण रस्ते, पुलांच्या निर्मितीसह परिसरात रोजगार निर्मिती आणि गृहबांधणीसह वाहतूक सुविधांवर भर देण्यात येणार आहे. जेणेकरून राहण्याच्या ठिकाणी अथवा आसपास रोजगार निर्मिती होऊन सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यावर भर दिला आहे. यासाठी एमएमआरडीएने जागतिक बँकेशी सहकार्य करार करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार गेल्या आठवड्यात बैठक पार पडली आहे.
सर्व परिवहन मार्गांचा विचार करणार
जागतिक बँकेच्या कौशल्याचा फायदा घेऊन आणि महामुंबईतील रेल्वे, मोनो, मेट्रो लाईनसह मुंबईची बेस्ट, ठाण्याची टीएमटी, नवी मुंबई महापालिकेची एनएमएमटी, कल्याण-डोंबिवलीची केडीएमटी या बससेवांची स्थानके, त्यांच्या सेवा, लोकल, मेट्रो, मोनो मार्ग, बुलेट ट्रेनची स्थानके यांचा विचार करून त्यानुसार परिवहन केंद्रित शाश्वत विकासावर भर देेऊन त्यादृष्टीने पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात येणार आहे. यानुसार विविध ४०० स्थानकांचा यासाठी विचार करून महामुंबईचा संपूर्ण चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे.
येथे विस्तीर्ण दळणवळण सुविधा वाढविणार
केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाने २०१७ मध्ये देशभरातील मोठ्या महानगरांत परिवहन केंद्रित विकासाची संकल्पना मांडली होती. त्यादृष्टीने महामुंबईचा विकास करण्यासाठी एमएमआरडीएने जागतिक बँकेची मदत घेतली आहे. कारण, गेल्या वर्षांपासून आर्थिक राजधानी मुंबईचा पसारा नवी मुंबई, उरण-पनवेल, ठाणे-भिंवडी, अंबरनाथ-बदलापूर ते मीरा-भाईंदर-वसई परिसरात वाढला आहे. भिवंडी-नवी मुंबईत जेएनपीटीमुळे लाॅजिस्टिक पार्क वाढत आहे. ग्रामीण भागातील कर्जत-कसारा परिसराचा विकास माेठ्या वेगाने होत आहे. त्या दृष्टीने या भागात राहण्यास येणाऱ्या वाढत्या लोकसंख्येला आणि येणाऱ्या उद्योगांसाठी हा परिवहन केंद्रित विकास करण्यात येणार आहे.
परिवहन केंद्रित विकासासाठी सर्व प्रकारची दळणवळणाची साधने अत्यावश्यक आहेत. जेणेकरून कोणत्याही भागातून कोणत्याही मार्गाने कोणत्याही ये-जा करणे सोपे होईल. त्या दृष्टीने शहर बस सेवा, टॅक्सी, खासगी वाहनांसह लोकल, मेट्रो, मोनो मार्ग, बुलेट ट्रेनची स्थानके एकमेकांना जोडून हा परिवहन केंद्रित विकास साधण्यात येणार आहे. येत्या काळात मुंबईतील कोस्टल राेड, मुंबई-दिल्ली डेडिकेटेड फ्रेट काॅरिडॉर, मुंबई-दिल्ली महामार्ग, मुंबई-नवी मुंबई सी लिंक अर्थात एमटीएचएलआर, विरार-अलिबाग काॅरिडॉरसह जलवाहतुकीच्या जेटी एकमेकांना जोडल्यावरच परिवहन केंद्रित शाश्वत विकास शक्य होणार आहे.
हरित पट्टे निर्माण करणार
केवळ विस्तीर्ण महामार्ग, मोठमोठे पूल, सी लिंक, रेल्वे, मेट्रो मार्ग बांधले, गृहनिर्मिती केली केली म्हणजे परिहवन केंद्रित विकास झाला असे नाही. यात मोठ्या प्रमाणात वृक्षांसह खारफुटीची कत्तल होणार आहे. ही हानी भरून काढण्यासाठी पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी ठिकठिकाणी हरित पट्टे निर्माण करण्यात येणार आहेत. त्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे.
नवी मुंबईत गृहनिर्मिती सुरू
परिवहन केंद्रित विकास लक्षात घेऊन नवी मुंबईतील विविध नोडमध्ये सिडकोने ज्या ९० हजार घरांचे बांधकाम सुरू केले आहे. ते रेल्वे, बसस्थानकांच्या परिसरातच सुरू केले आहे. तळोजा, द्रोणागिरी, खारकोपर, बामणडोंगरी आणि जुईनगर येथील सिडकोची घरे ही रेल्वे स्थानके, बसस्थानकांसह महामार्गाला लागूनच बांधण्यात येत आहेत.