पाच दिवसांतच मोडला संसार
By admin | Published: May 13, 2017 01:24 AM2017-05-13T01:24:30+5:302017-05-13T01:24:30+5:30
शीर व पाय नसलेला अज्ञात महिलेचा मृतदेह रबाळे एमआयडीसीमध्ये आढळून आला होता. या मयत महिलेच्या मानेवर गणपतीच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : शीर व पाय नसलेला अज्ञात महिलेचा मृतदेह रबाळे एमआयडीसीमध्ये आढळून आला होता. या मयत महिलेच्या मानेवर गणपतीच्या टॅटूवरून तिची ओळख पटली आहे. प्रियंका गुरव असे तिचे नाव असून घटनेच्या पाच दिवस अगोदरच तिचा प्रेमविवाह झालेला आहे.
रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाल्यामध्ये ही घटना घडली होती. महिलेची हत्या करून शीर व पाय वेगळे करून फक्त धड त्याठिकाणी टाकण्यात आले होते. यावेळी सदर मृत महिलेच्या मानेवर गणपतीचा टॅटू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. याच टॅटूवरून तिची ओळख पटली आहे. प्रियंका सिद्धेश गुरव (२४) असे तिचे नाव असून ती वरळीची राहणारी आहे. ३० एप्रिलला तिचा सिद्धेश यांच्यासोबत प्रेमविवाह झाला आहे. लग्नापूर्वी ती दिवा गाव येथे मामाच्या घरी राहायची. लग्नानंतर ती सासरी गेली असता पाच दिवसातच ती घरातून बेपत्ता झाली होती. नोकरीच्या शोधात ती घराबाहेर गेली असता परत आलीच नाही असे तिच्या सासरच्यांचे म्हणणे आहे. यानुसार ती बेपत्ता झाल्याची पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर दोनच दिवसांत रबाळे एमआयडीसी हद्दीत एका महिलेचा मृतदेह आढळला असल्याची माहिती तिचा भाऊ गणेश भामरे यांना मिळाली. यावरून त्यांनी मृतदेहाची पाहणी केली असता, मानेवरील गणपतीच्या टॅटूमुळे तिची ओळख पटली. दोन महिन्यांपूर्वी प्रियंकाने मानेवर काढलेला टॅटू गणेशला दाखवलेला होता. यामुळे तिची ओळख पटवणे शक्य झाले. परंतु लग्नानंतर पाच दिवसातच नोकरीच्या शोधात घराबाहेर गेली कशी असा माहेरच्यांना प्रश्न पडला आहे. यामुळे तिच्या बेपत्ता होऊन हत्या होन्यामागे कोणाचातरी पूर्वनियोजित कट असल्याचा संशय तिच्या माहेरच्यांनी व्यक्त केला आहे.
प्रियंकाच्या लहानपणीच आई- वडिलांच्या निधनानंतर मामांनी त्यांचे संगोपन केले आहे. दोन वर्षांपासून तिचे व सिद्धेशचे एकमेकांवर प्रेम होते. सुरवातीला घरच्यांचा त्यांच्या प्रेमविवाहाला विरोध होता. मात्र तिच्या हट्टामुळे घरचे दोघांच्या लग्नाला तयार झाले होते. मात्र लग्नाच्या दोन दिवस अगोदर तिने काही क्षणासाठी लग्नाला नकार देत भीती व्यक्त केली होती असेही भाऊ गणेश भामरे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करून मारेकऱ्याला अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.