कळंबोली : नवीन पनवेल येथील इन्फिनेटी फाउंडेशन आणि कामोठे एमएनआर स्कूलच्या वतीने शुक्रवारी जागतिक शांतता दिवस साजरा करण्यात आला. शाळेतील सातशे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वुई लव्ह पीस असे अक्षर तयार करून शांततेचा संदेश दिला.जागतिक शांतता सर्व देशांकरिता महत्त्वाची आहे. त्याशिवाय कोणालाच प्रगती करता येणार नाही. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामुळे जागतिक शांतता धोक्यात आली होती. त्यानंतर जागतिक शांतता परिषदेची स्थापना करण्यात आली. आज जागतिक पातळीवर शीतयुद्ध सुरू आहे. ते शमविण्याचा प्रयत्न युनोकडून सुरू आहे. या पाशर््वभूमीवर शांततेचा संदेश देण्यासाठी आंतरराष्ट्रीय शांतता दिवस जगभर साजरा करण्यात येतो. कामोठे येथील एमएनआर स्कूलच्या मैदानावर सफेद कपडे घालून विद्यार्थ्यांनी आम्ही शांतताप्रिय असल्याचा संदेश दिला. इन्फिनेटी फाउंडेशन नवीन पनवेलचे प्रेसिडेन्ट अयुफ अंकुला, उपाध्यक्ष अभिषेक तायडे, महापालिकेच्या सहायक आयुक्त तेजस्विनी गलांडे, पोलीस उपनिरीक्षक राजेश जयस्वाल, शाळेच्या मुख्याध्यापिका अखिला दिनेश व शिक्षक उपस्थित होते.
जागतिक शांतता दिवस, विद्यार्थ्यांनी दिला शांततेचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 2:46 AM