जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद : जमुना बोरोची विजयी सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 04:27 AM2019-10-05T04:27:50+5:302019-10-05T04:28:26+5:30
जमुना बोरो (५४ किलो) हिने महिला विश्व बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताला शानदार सुरुवात करुन देताना उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
उलान उदे : जमुना बोरो (५४ किलो) हिने महिला विश्व बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताला शानदार सुरुवात करुन देताना उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. बोरोने मंगोलियाच्या मिचिडमा एर्डेनेडालाईचा ५-० ने पराभव केला. आता तिला अल्जेरियाच्या पाचव्या मानांकित उदाद फाऊच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.
जागतिक अजिंक्यपद २०१७ च्या सुवर्णपदक विजेत्या फाऊला पहिल्या फेरीत बाय मिळाला होता. शनिवारी नीरज (५७ किलो) व स्वीटी बुरा (७५ किलो) यांचे सामने रंगतील. नीरजची लढत चीनच्या कियाओ जीरूसोबत होईल, तर स्वीटी मंगोलियाच्या म्यागमाजगराल एमविरुद्ध लढेल. या स्पर्धेत ५७ देशांचे २२४ बॉक्सर्स सहभागी झाले आहेत. (वृत्तसंस्था)