नवी मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रस्तावावरून जगातील पहिले मोफत टायफॉइड लसीकरण अभियान नवी मुंबई महानगरपालिका राबविणार आहे. दोन टप्प्यात शहरातील ९ ते १५ वर्षे वयोगटातील तब्बल चार लाख मुलांना लस देण्यात येणार आहे. १४ जुलैपासून लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू केला जाणार आहे.टायफॉइड होऊ नये यासाठी ९ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांना लस देण्यात येते. देशात व जगभर खासगी डॉक्टरांकडे ही लस उपलब्ध असते. देशात आतापर्यंत चार लाख डोसेस खासगी डॉक्टरांच्यावतीने देण्यात आले आहेत. अद्याप जगात कुठेच शासकीय स्तरावर हे अभियान राबविण्यात आलेले नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रस्तावावरून महानगरपालिकेने हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाला केंद्र व राज्य सरकारने तांत्रिक मान्यता दिली आहे. २०१८ व २०१९ मध्ये दोन टप्प्यात २२ नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून हे अभियान राबविण्यात येणार आहे. दोन वर्षांत चार लाख मुलांना लस देण्यात येणार आहे. यासाठी उत्पादक कंपनीकडून पहिला डोस मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असून, उर्वरित ३ लाख डोसेस प्रति डोस २०० रुपये दराने मनपा विकत घेणार आहे. या अभियानासाठी ६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.१४ जुलै ते २५ आॅगस्ट २०१८ दरम्यान पहिल्या टप्प्यात १,८१,५९८ मुलांना लस देण्यात येणार आहे. यासाठी ११ नागरी आरोग्य केंद्रांच्या अखत्यारीत १२१० बुथवर मोफत लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रुग्णालये, अंगणवाडी, शाळा, मंदिर व इतर ठिकाणी लसीकरणासाठी बुथ सुरू करणार आहेत. यासाठी पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रातील सर्व वैद्यकीय अधिकारी, रुग्णालय प्रमुख, बालरोगतज्ज्ञ, नागरी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. मनपा क्षेत्रातील सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिक व इंडियन अॅकॅडमी आॅफ पिडीयाट्रिक्स यांच्या बालरोगतज्ज्ञांच्या कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत.यांचा आहे सहभाग : टायफॉइड लसीकरण अभियानामध्ये जागतिक आरोग्य संघटना - भारत, सेंट्रल फॉर डिसीज कंट्रोल अटलांटा, हे अभियानाची आखणी नियोजन व व्यवस्थापनामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणार आहेत. इंडियन कॉन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च कोलकाता, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ कॉलरा अॅण्ड इंटेरिक डिसीज (एनआयसीईडी) या संस्थांचे लसीकरण झालेले लाभार्थी, तसेच संशयित टायफॉइड रुग्ण यांची माहिती संकलित करणे, लसीकरणोत्तर समीक्षा व कार्योत्तर अहवाल ही जबाबदारी जागतिक आरोग्य संघटना - भारत व सीडीसीची असणार आहे.पत्रकार परिषदेमध्ये दिली माहितीमहापौर जयवंत सुतार व आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी पत्रकार परिषदेमध्ये मोफत टायफॉइड लसीकरण मोहिमेची माहिती दिली. या वेळी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, आरोग्य समिती सभापती उषा भोईर, अतिरिक्त आयुक्त रमेश चव्हाण, वैद्यकीय आरोग्य अधिकारी दयानंद कटके, अपघात वैद्यकीय अधिकारी रत्नप्रभा चव्हाण उपस्थित होते.नावीन्यपूर्ण अभियानांची पार्श्वभूमीनवी मुंबई महानगरपालिका नावीन्यपूर्ण अभियान राबविण्यासाठी प्रसिद्ध आहे. यापूर्वी पोलिओ लसीकरण मोहीमही देशात सर्वात पहिली व प्रभावीपणे राबविण्यात आली होती. संत गाडगेबाबा व स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबवून राज्यात व देशात क्रमांक मिळविला आहे. स्वातंत्र्यानंतर स्वत:च्या मालकीचे धरण विकत घेणारी पहिली महापालिका ठरली आहे. देशातील सर्वात अत्याधुनिक क्षेपणभूमी, मलनि:सारण केंद्र नवी मुंबईमध्ये असून, २४ तास पाणीपुरवठा करणारीही देशातील पहिली महापालिका आहे. टायफॉइड लसीकरण मोहीम यशस्वी झाल्यास मनपाचाही जागतिक स्तरावर नावलौकिक होणार आहे.नवी मुंबई महानगरपालिका नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी प्रसिद्ध आहे. यापूर्वी पोलिओ लसीकरण अभियानही सर्वात प्रथम व प्रभावीपणे महापालिकेने राबविले होते. टायफॉइड लसीकरण अभियानही जागतिक स्थरावर पथदर्शी ठरणार आहे.- जयवंत सुतार,महापौर, नवी मुंबईटायफॉइड लस खासगी डॉक्टरांकडून देण्यात येते. जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशीवरून जगात पहिल्यांदा मोफत लसीकरण मोहीम नवी मुंबई महानगरपालिका राबविणार असून, या प्रयोगानंतर ते देशभर राबविणे शक्य होणार आहे. दोन टप्प्यात चार लाख मुलांना मोफत लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.- डॉ. रामास्वामी एन.,आयुक्त, महानगरपालिका