सूर्यकांत वाघमारे / नवी मुंबईपोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात गतवर्षी बलात्काराच्या १३९ घटना घडलेल्या आहेत. २०१५च्या तुलनेत गुन्ह्यांची ही संख्या ३५ने अधिक असून त्यापैकी १११ घटना ओळखीतून झाल्या आहेत, तर ६१ गुन्ह्यांमध्ये १८ वर्षांखालील अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाले असून, एकूण गुन्ह्यांपैकी ६४ टक्के बलात्कार प्रेमप्रकरणात लग्नाचे आमिष दाखवून झालेले आहेत.शाळा व महाविद्यालयांच्या आवारासह परिसरातील उद्याने प्रेमीयुगुलांनी व्यापली आहेत. त्यामध्ये महाविद्यालयीन तरुण-तरुणींसह शाळकरी मुला-मुलींचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. कुमारवयातच प्रेमात सैराट झालेल्या या प्रेमीयुगुलांकडून प्रौढांना लाजवेल,असे चाळे केले जात आहेत. ही बाब पालकांपासून लपत असल्याने गंभीर परिणाम उमटत आहेत. गतवर्षात पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात बलात्काराच्या एकूण १३९ घटना घडलेल्या आहेत. त्यापैकी १११ गुन्हे ओळखीच्या व्यक्तीकडूनच, तर १२ गुन्हे नातेवाइकांकडून झालेले आहेत. मात्र, एकूण गुन्ह्यांपैकी ६४ टक्के गुन्हे प्रेमसंबंधातून लग्नाचे आमिष दाखवून झाल्याचे पोलिस तपासाअंती उघड झालेली आहे. ही बाब समस्त पालकवर्गासाठी चिंतेची ठरत आहे. लग्नाचे आमिष दाखवून अनेक प्रेमीयुगुल शरीरसंबंध करतात. मात्र, काही कालावधीनंतर प्रियकराने विविध कारणांमुळे लग्नाला नकार दिल्यास, पे्रयसीकडून प्रियकराविरोधात पोलिसांकडे बलात्काराची तक्रार केली जाते. तर काही प्रकरणांमध्ये मुलगी अल्पवयीन असतानाही तिच्यासोबत प्रेमसंबंध ठेवून तरुणाने पळवून नेल्याचेही उघडकीस आलेले आहे. अशा अनेक प्रकरणातून पळालेल्या मुलींची गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने सुटका करून पालकांच्या ताब्यात दिले आहे. अशा प्रकरणांमध्ये मुलगी अल्पवयीन असताना तिच्यासोबत शरीरसंबंध केल्यामुळे पालकाच्या तक्रारीनुसार संबंधितांवर पास्को अंतर्गत कारवाई केली जाते.२०१५मध्ये पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात बलात्काराच्या १०४ घटना घडल्या आहेत. त्यापैकी १०२ गुन्ह्यांची उकल करून पोलिसांनी संबंधितांवर कारवाई केलेली आहे; परंतु २०१५च्या तुलनेत २०१६मध्ये बलात्काराच्या ३५ अधिक घटना घडल्या आहेत. तपासाअंती गतवर्षीच्या १३९ पैकी १३४ बलात्काराच्या गुन्ह्यांची उकल झाल्याची माहिती पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली आहे.
शहरात सर्वाधिक गुन्हे महिलांवरील अत्याचाराचे
By admin | Published: January 09, 2017 7:18 AM