लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : महाराष्ट्राने अनेक मोठे साहित्यिक व कलाकार या देशाला दिले आहेत. त्यांचे साहित्य व कलाकृती आजही अजरामर आहेत. आजच्या साहित्य संमेलनामध्ये साहित्याची हानी होत आहे. मराठी साहित्यांमध्ये लोकप्रियतेचा धोका आहे. यातून साहित्यकारांनी बाहेर पडणे आवश्यक आहे. साहित्यकाराने कधीही प्रेक्षकांच्या प्रतिसादाची अपेक्षा ठेवू नये, नेहमी स्वत:ला स्वत:च दाद दिली पाहिजे, असे प्रतिपादन राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी केले.
नवी मुंबई प्रेस क्लब आणि नवी मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने व कोकण विभागीय माहिती कार्यालयाच्या सहकार्याने पत्रकार दिनानिमित्त वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात ‘एकविसाव्या शतकातील २१वे वर्ष: आव्हाने’ या परिसंवादाचे आयोजन केले होते. तर महाराष्ट्राची वैचारिक परंपरा सर्वश्रेष्ठ आहे. महाराष्ट्राची भूमी विचार देणारी आहे. महाराष्ट्र वैचारिक परंपरेचा पाया त्या काळी बाळशास्त्री जांभेकरांनी रचल्याची माहिती ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी यावेळी दिली.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले. उपसंचालक (माहिती) कोकण विभाग डॉ. गणेश मुळे यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल माहिती दिली, यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी, ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर, नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, कोकण विभागाचे उपसंचालक (माहिती) गणेश मुळे उपस्थित होते.
लोकशाही अधिक सुदृढ करण्यासाठी घटनेनुसार कार्य होण्याची गरज आहे. तसेच शासनाने शिक्षण आणि आरोग्य या दोन महत्त्वाच्या बाबींवर अधिक लक्ष द्यायला हवे. वैज्ञानिक विचार व दृष्टिकोन वाढवितानाच शालेय शिक्षण अभ्यासक्रमात राज्यघटना हा विषय शिकवणेसुध्दा तितकेच गरजेचे असल्याचे मत डॉ. विश्वंभर चौधरी यांनी मांडले.