रेल्वेकडून चुकीची उद्घोषणा, रेल्वेप्रवासी पोहचले थेट कारशेडला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 07:40 PM2019-06-25T19:40:17+5:302019-06-25T19:40:50+5:30
वाशी स्थानकातला प्रकार : कारशेडला जाणाऱ्या लोकलची ठाणेला जाणारी लोकल अशी घोषणा
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : रेल्वेच्या चुकीमुळे रेल्वेप्रवाशी ठाणे ऐवजी कारशेडला पोहचल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. कारशेडला जाणारी लोकल वाशी स्थानकात उभी असताना ठाणेला जाणारी लोकल अशी उद्घोषणा झाली. त्यामुळे प्रवासी त्यात बसलेले असताना, ती लोकल थेट कारशेडला पोहचली.
मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास वाशी रेल्वेस्थानकात हा प्रकार घडला.
कारशेडला जाणारी लोकल उभी असताना, रेल्वे प्रशासनाच्या चुकीमुळे ती लोकल ठाणेला जाणारी असल्याची घोषणा झाली. त्यामुळे ठाणेला जाणारे प्रवासी त्या लोकलमध्ये बसले होते. मात्र काही वेळातच ही लोकल ठाणेला जाणाऱ्या ट्रॅकऐवजी कारशेडला जाणाऱ्या ट्रॅकवर चालू लागली. हा प्रकार प्रवाशांच्या निदर्शनास येईर्पयत लोकल सानपाडा कारशेडमध्ये पोहचली होती. अखेर लोकल ठाणेऐवजी कारशेडला पोहोचल्याने फसगत झालेल्या रेल्वे प्रवाशांना कारशेडमधून पायी सानपाडा अथवा वाशी स्थानकाकडे यावे लागले. या प्रकारचा रेल्वे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून चुकीची अनाऊंसमेंट झाल्याने झालेल्या त्रासाबद्दल प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तर संबंधितांवर कारवाई करण्याचीही मागणी होत आहे.