विरोधामुळे यादवनगरची कारवाई अखेर थांबली

By admin | Published: February 14, 2017 04:33 AM2017-02-14T04:33:39+5:302017-02-14T04:33:39+5:30

यादवनगरमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई सुरु असताना रहिवाशांनी तीव्र विरोध करत ठिय्या मांडला. अशातच कारवाईपूर्वीच

Yadavavnagar's action finally stopped due to opposition | विरोधामुळे यादवनगरची कारवाई अखेर थांबली

विरोधामुळे यादवनगरची कारवाई अखेर थांबली

Next

नवी मुंबई : यादवनगरमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई सुरु असताना रहिवाशांनी तीव्र विरोध करत ठिय्या मांडला. अशातच कारवाईपूर्वीच विभाग अधिकारी दत्तात्रय नागरे यांची प्रकृती खालावल्यामुळे ही कारवाई पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, नागरे यांची प्रकृती ठीक असून त्यांना डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
एमआयडीसी व महापालिकेच्या वतीने संयुक्तरीत्या कारवाईची मोहीम शहरात सुरु आहे. यानुसार मागील काही दिवसात यादव नगर, चिंचपाडा व देवीधाम नगर परिसरातील एक हजाराहून अधिक अनधिकृत झोपड्या व गाळे जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. एमआयडीसीचे भूखंड बळकावून भूमाफियांनी त्यावर झोपड्या उभारुन त्या विकलेल्या आहेत. यानुसार सोमवारी देखील त्याठिकाणी एमआयडीसी व पालिकेची संयुक्त कारवाई ठरलेली होती. कारवाईची संपूर्ण धुरा पालिकेकडे असल्यामुळे कारवाईपूर्वीच त्याठिकाणी पालिका अधिकारी उपस्थित होते. त्यांच्याकडून कारवाईची तयारी सुरु असतानाच घणसोलीचे विभाग अधिकारी दत्तात्रय नागरे जमिनीवर कोसळले. हे पाहताच त्याठिकाणी उपस्थित इतर पालिका अधिकाऱ्यांनी त्यांना तत्काळ लगतच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. यानंतर काही वेळाने त्यांना नेरुळच्या डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
नागरे यांच्याकडे घणसोलीचा पदभार असताना ऐरोली विभागाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आलेली आहे. यामुळे मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या अतिक्रमणाच्या कारवाईची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. सोमवारी देखील ते कारवाईच्या तयारीत असतानाच, रक्तदाब वाढल्याने चक्कर येवून जमिनीवर कोसळले. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपस्थित इतर अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कारवाईला सुरवात करण्यात आली. परंतु झोपडपट्टीधारकांनी मोठ्या संख्येने जमाव जमवून कारवाईला तीव्र विरोध केला. त्यांनी अतिक्रमण विरोधी पथकाच्या मार्गावर ठिय्या मांडून रोष व्यक्त केला. यावेळी घटनास्थळी अवघे १५ ते २० पोलीस उपस्थित होते. दिघा येथील अनधिकृत इमारतीवर जप्तीच्या कारवाईच्या अनुषंगाने स्थानिक पोलिसांचा त्याठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला होता. यामुळे यादवनगरमधील कारवाईवेळी फक्त अतिक्रमण विरोधी पथकाचे पोलीस हजर होते. याचाच फायदा अनधिकृत झोपड्यांमधील रहिवाशांनी घेत कारवाईला विरोध केला. या प्रकारामुळे दुपारपर्यंत परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, याकरिता कारवाईला स्थगिती देण्यात आली.

Web Title: Yadavavnagar's action finally stopped due to opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.