यादवची आठही बँक खाती रिकामी

By Admin | Published: September 17, 2016 02:24 AM2016-09-17T02:24:35+5:302016-09-17T02:24:35+5:30

माथाडींच्या बोगस घरवाटप प्रकरणी अटकेत असलेल्या तिघांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. या प्रकारात अनेकांची कोट्यवधीची फसवणूक झालेली

Yadav's eight bank accounts are vacant | यादवची आठही बँक खाती रिकामी

यादवची आठही बँक खाती रिकामी

googlenewsNext

नवी मुंबई : माथाडींच्या बोगस घरवाटप प्रकरणी अटकेत असलेल्या तिघांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. या प्रकारात अनेकांची कोट्यवधीची फसवणूक झालेली असून पोलिसांनी यादवच्या बँक खात्याची देखील तपासणी केली. मात्र यादवची आठही बँक खाती रिकामीच आढळून आली आहेत.
माथाडी कामगारांची घरे बिगर माथाडींना देण्याचे आमीष दाखवून अनेकांची कोट्यवधीची फसवणूक झाल्याचा प्रकार नुकताच उघड झाला आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी तिघांना अटक केलेली आहे. दिलीप यादव, संतोष चव्हाण व संतोष जाधव अशी त्यांची नावे आहेत. यादव हा सूत्रधार असून इतर दोघांचा या प्रकरणात कितपत सहभाग आहे याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. नेत्यांच्या कोट्यातून घरे देण्याचे आमिष दाखवून यादवने मागील दोन वर्षात सुमारे ५ ते ६ कोटी रुपयांचा अपहार केल्याची तक्रार पोलिसांकडे प्राप्त झाली आहे. माथाडी कामगार युनियनचे लेटरहेड, पदाधिकाऱ्यांच्या सह्या तसेच सिडकोच्या स्टँपचा वापर करुन अनेकांना फसवण्यात आलेले आहे. युनियन कार्यालयातच काम करत असल्याची संधी साधत यादवने लेटरहेड व सह्यांचा गैरवापर करुन हा प्रकार केल्याचे युनियनचे म्हणणे आहे. परंतु या प्रकरणात इतरही काही व्यक्तींचा सहभाग असल्याची शक्यता तक्रारदारांनी वर्तवलेली आहे. त्यानुसार यादवच्या संपर्कात असलेल्या व युनियनशी संबंधित काही व्यक्तींवर पोलीस नजर ठेवून आहेत. तर यादवने फसवणुकीसाठी वापरलेल्या युनियनच्या लेटरहेडवरील आवक जावक खरा की खोटा याची पडताळणी करण्यासाठी त्या काळात झालेल्या पत्रव्यवहाराची देखील पोलीस चाचपणी करणार आहेत.
दरम्यान, यादवच्या अटकेनंतर एपीएमसी पोलिसांनी त्याच्या विविध बँकेतील आठ खात्यांची तपासणी सुरू केली होती. त्यामध्ये एका वेळी लाखो रुपयांच्या व्यवहाराच्या नोंदी असून सुमारे ५ ते ६ कोटींची उलाढाल झाल्याचे समोर आले आहे. परंतु सद्यस्थितीला सर्व खात्यामध्ये मिळून साधारण ८ ते १० हजार रुपये आहेत. त्यामुळे यादवच्या बँक खात्यात जमा झालेली कोट्यवधीची रक्कम रातोरात गेली कुठे याचा उलगडा करण्याच्या प्रयत्नात पोलीस आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Yadav's eight bank accounts are vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.