भक्ती सोमण, मुंबईभगवान श्रीकृष्णाला जन्म देवकीने दिला होता. पण लहानपणापासून त्याला घडवले ते यशोदाने. त्याची कथा आपण अनेकदा वाचली असेल. किंबहुना यशोदाचा मुलगा म्हणूनच कृष्णाकडे पाहिले जाते. ही झाली पुराणकाळातील गोष्ट. आज २१ व्या शतकातही अशी एक आई आहे की जिने आपल्या मुलाच्या मित्राला गेली १८ वर्षे पोटच्या मुलाप्रमाणे वाढवले आहे. त्या आईचे नाव नीना म्हात्रे, तर तो मुलगा म्हणजे तुषार देशमुख. तुषारची आई प्रीती यांचे ९३ साली झालेल्या बॉंबस्फोटात निधन झाले. त्या वेळी तुषार ९ वीत होता. यामुळे साहजिकच संपूर्ण देशमुख कुटुंबाला धक्का बसला होता. तुषारही कोलमडला होता. आईला जाऊन वर्षही होत नाही तोवर त्याच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. मात्र त्या नव्या आईला स्वीकारणे तुषारसाठी सोपी गोष्ट नव्हती. ती आई इतरांसाठी डबे करून विकायची. पण घरी तुषारला मात्र वडापाववर दिवस काढावे लागले. अशा अनेक गोष्टी घडत असताना हळूहळू वडिलांशीही संवाद तुटत गेला. पुढे १० नंतर कॉलेजमध्ये अॅडमिशन घेण्यासाठी लागणारी फी त्याने घरोघरी लोणची, पापड-मसाले विकून जमा केली. कीर्ती कॉलेजमध्ये काही दिवसांतच प्राचार्यांनाही तुषारच्या एकंदर परिस्थितीची कल्पना आली. कारण घरी झोपण्यापेक्षा तुषार कॉलेजच्या कँटीनमध्ये झोपत असे. हे पाहून तुषारच्या परिस्थितीशी कल्पना आल्यावर त्यांनी त्याला हॉस्टेलमध्ये राहण्यास सांगितले. कॉलेजमध्ये ११ वीत त्याची भेट योगेश म्हात्रेशी झाली. मैत्री वाढत गेल्यावर साहजिकच तुषारचे योगेशच्या घरी येणेजाणे वाढले. योगेशच्या आई नीना आणि वडील दिलीप म्हात्रे यांच्याशीही खूप छान सूर जुळले. तुषारसाठी आवडीचे पदार्थ बनवण्याबरोबरच आजारपणातही त्याला आधार दिला. सलग ६ महिने हॉस्टेलवर राहत असताना तुषारच्या मेहनतीची, जगण्याच्या जिद्दीची कल्पना त्यांना आली. १२ वी झाल्यावर एक दिवस योगेशनचे आपण कायमच तुषारला आपल्याकडे आणायचे का, अशी विचारणा आई-बाबांकडे केली. नीना आणि दिलीप यांनी काही महिन्यांची ओळख असलेल्या तुषारला आपल्याकडे ठेवायचे हा निर्णय कुठलाही आढेवेढे न घेता पक्का केला. समाज, आपले इतर कुटुंब काय म्हणेल याचा कुठलाही विचार त्यांनी त्याक्षणी केला नाही. योगेश, कुंदन या आपल्या मुलांप्रमाणेच आता तुषार आपला तिसरा मुलगा असल्याचे त्यांनी ठरवून टाकले. कोणाचीही पर्वा त्यांनी केली नाही. तेव्हापासून आजवर म्हात्रे कुटुंबीयांच्या प्रत्येक निर्णयात कुटुंबाचा एक भाग म्हणून तुषारचा सहभाग असतो. अठरा वर्षांच्या काळात या विविध प्रसंगांत नीना आणि तुषारचे नाते आई-मुलगा म्हणून खूप बहरत गेले. तुषारला त्यांनी अगदी प्रत्येक गोष्टीत भरभक्कम साथ दिली. १३ वी नंतर टेन्शनमुळे तुषारला ब्लडप्रेशरचा खूप त्रास झाल्याने अॅडमिट करावे लागले होते. त्यावेळी ६ दिवस हॉस्पिटलमध्ये दिवसरात्र नीना-दिलीप आणि योगेश त्याच्या सोबत होते. नीना तर हॉस्पिटलमधून तुषारला घेऊनच घरी गेल्या. तर दोन वर्षांपूर्वी नीना यांना काही दिवस अस्वस्थ वाटत होते. ती चलबिचल तुषारच्या लक्षात आली होती. त्यांनी याची कल्पना योगेशलाही दिली. पण पाच दिवसांनी खूप अस्वस्थ वाटतंय म्हणून नीना यांनी पहिला फोन तुषारलाच केला. १३ वी नंतर योगेश आणि तुषार यांनी माया आॅटो रेन्टल हा स्वतंत्र व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. पैशांची अत्यंत आवश्यकता होती. त्या वेळी परिस्थिती कळल्यावर क्षणार्धात दागिन्यांचा डबा तुषारच्या हाती दिला. अशा कित्येक प्रसंगांत तुषार आणि नीना यांचे आई-मुलाचे नाते वृद्धिंगत होत गेले आहे.
आधुनिक युगातील यशोदा
By admin | Published: May 10, 2015 4:48 AM