वाशी पुलावरून तरुणाची आत्महत्या?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 05:35 AM2017-08-19T05:35:27+5:302017-08-19T05:35:50+5:30
वाशी खाडीपुलावरून मुलुंड येथील तरुणाने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे
नवी मुंबई : वाशी खाडीपुलावरून मुलुंड येथील तरुणाने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुलावर बेवारस स्थितीमध्ये उभ्या असलेल्या मोटारसायकलवरील बॅगमध्ये या तरुणाने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. परंतु शोध घेऊनही पत्ता न लागल्याने तो हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
शुक्रवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास वाशी खाडी पुलावर हा प्रकार घडला. त्याठिकाणी बेवारस स्थितीमध्ये एक मोटारसायकल उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार पोलिसांनी त्याठिकाणी पाहणी केली असता, एक मोटारसायकल उभी असून त्यावर बॅग लटकवलेली होती. शिवाय त्याच ठिकाणी बूटदेखील काढून ठेवलेले होते. यानुसार सदर तरुणाने आत्महत्या केल्याच्या शक्यतेवरून पोलिसांनी मच्छीमारांच्या मदतीने खाडीमध्ये शोधदेखील घेतला. मात्र पोलिसांना काहीच हाती लागले नाही. अखेर बॅगच्या झडतीमध्ये सदर तरुणाचे नाव नीलेश भोसले असून त्याने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली.
एका घटस्फोटित दाम्पत्याकडून होत असलेल्या मनस्तापातून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख असल्याचे समजते. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी त्याच्या घरच्यांची
माहिती मिळवून त्यांना या प्रकरणाची माहिती दिली आहे. त्यांच्याकडेही पोलीस अधिक चौकशी करत
आहेत. मात्र त्याने खाडीत उडी मारल्याचा एकही प्रत्यक्षदर्शी नसल्यामुळे तो हरवल्याची
प्राथमिक तक्रार वाशी
पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.