- सुरेंद्र राऊत यवतमाळ - जन्मदात्या बापानेच तीन वर्षांच्या चिमुकल्याची तेलंगणातील निर्मल येथे विक्री केली. हा प्रकार आईच्या लक्षात आल्यानंतर तिने स्वत: गावात जाऊन खातरजमा केली व नंतर आर्णी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी संशयितांपैकी काहींची धरपकड केली. मुलाला कुठे विकले याचा शोध पोलिस घेत आहेत.
जय श्रावण देवकर (३) असे चिमुकल्या मुलाचे नाव आहे. तो श्रावण दादाराव देवकर (३२, रा. कोपरा) यांच्यासोबत राहत होता. तर श्रावणचा त्याची पत्नी पुष्पा हिच्याशी वाद होता. पती सतत मारहाण करीत असल्याने त्याच्या जाचाला कंटाळून पुष्पा यवतमाळ येथील नातेवाइकांकडे वास्तव्याला होती. मुलगा जय याची विचारपूस करण्यासाठी ती कोपरा येथे गेली असता, गुरुवारी हा प्रकार लक्षात आला. तिने दिलेल्या तक्रारीवरून आर्णी पोलिसांनी श्रावण देवकर, चंद्रभान देवकर, कैलास गायकवाड, बाल्या बोबडे या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यातील काही संशयितांना ताब्यात घेतले. एकाला सोबत घेऊन पोलिस पथक तेलंगणात रवाना झाले. मुलाला कुठल्या कारणाने कशासाठी विकले याचा शोध पोलिस घेत आहेत. या घटनेने मात्र तालुक्यात खळबळ उडाली आहे. आर्णी ठाणेदार केशव ठाकरे यांना तपासाबाबत विचारणा केली असता, त्यांनी अधिक माहिती देण्याचे टाळले.