नवी मुंबईकरांची वर्षभराची पाणीचिंता मिटली; मोरबे धरण भरले, ३३३ दिवस पुरेल एवढा साठा उपलब्ध

By नामदेव मोरे | Published: August 28, 2024 04:46 PM2024-08-28T16:46:56+5:302024-08-28T16:47:17+5:30

पुढील ३३३ दिवस पुरेल एवढे पाणी धरणात उपलब्ध असून महानगरपालिकेच्यावतीने गुरूवारी जलपूजन करण्यात येणार आहे.

Year-long water worries of Navi Mumbai residents are over; | नवी मुंबईकरांची वर्षभराची पाणीचिंता मिटली; मोरबे धरण भरले, ३३३ दिवस पुरेल एवढा साठा उपलब्ध

नवी मुंबईकरांची वर्षभराची पाणीचिंता मिटली; मोरबे धरण भरले, ३३३ दिवस पुरेल एवढा साठा उपलब्ध

नवी मुंबई : खारघर, कामोठेसह नवी मुंबईला पाणी पुरवठा करणारे मोरबे धरण बुधवारी भरले. नवी मुंबईकरांची संपूर्ण वर्षभराची पाणीचिंता मिटली आहे. पुढील ३३३ दिवस पुरेल एवढे पाणी धरणात उपलब्ध असून महानगरपालिकेच्यावतीने गुरूवारी जलपूजन करण्यात येणार आहे.

यावर्षी पाऊस उशीरा सुरू झाल्यामुळे मोरबे धरण भरणार का याविषयी शंका उपस्थित केली जात होती. १ जुलैला ५४ दिवस पुरेल एवढेच पाणी धरणात शिल्लक होते. परंतु त्यानंतर संपूर्ण महिन्यात सातत्याने पाऊस पडल्यामुळे पाणी साठा झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत धरण परिसरात ३३६१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी सकाळी धरण पूर्णपणे भरले आहे. ८८ मिटरपर्यंत पाणी भरले असून यापुढे पाऊस पडला नाही तरी पुढील २६ जुलैपर्यंत शहराला पाणी उपलब्ध होणार आहे. धरण भरल्यामुळे नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. गतवर्षीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. सप्टेंबरमध्येही पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे पाणी साठा स्थिर राहण्यासत मदत होणार आहे.

महानगरपालिका प्रशासनाने गुरूवारी जलपूजन करण्याचा निर्णय घेतला आहे. धरण भरले असले आहे पण पाऊस कमी असल्यामुळे अद्याप जास्त विसर्ग सुरू झालेला नाही. मुसळधार पाऊस पडला तर धरणाचे दराजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला जाणार आहे. धरणाच्या परिसरातील गावांना यापुर्वीच सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

खारघर, कामोठेवासीयांनाही दिलासा

मोरबे धरणातून नवी मुंबईतील बेलापूर ते ऐरोली पर्यंत पाणी पुरवठा केला जातो. याशिवाय पनवेल महानगरपालिकेतील खारघर व कामोठे विभागालाही पाणी देण्यात येते. यामुळे त्या परिसरातील नागरिकांचीही वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.

तीन वर्षातील पाण्याचे प्रमाण

वर्णन - २०२२ - २०२३ - २०२४
एकूण पाऊस मिमी - २७१२ - ३०१८ - ३३६१
धरण पातळी मिटर - ८५ - ८६ - ८८
ग्रॉस स्टोरेज - १६३ - १७८ - १९०
टक्केवारी - ८५ - ९३ - १००

दोन महिन्यातील पाणी साठ्याचा तपशील

वर्णन - २ जुलै - २८ ऑगस्ट
ग्रॉस स्टोरेज - ५३ एमसीएम - १९० एमसीएम
डेड स्टोरेज - १० एमसीएम - १९.९२ एमसीएम
शिल्लक साठा - ३४ एमसीएम - १७० एमसीएम
वापरण्यायोग्य साठा - २४ एमसीएम - १५९ एमसीएम
किती दिवसाची क्षमता - ५४ - ३३३

Web Title: Year-long water worries of Navi Mumbai residents are over;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.