- कांता हाबळेनेरळ : तू मुलगी आहेस, खेळ तुझं काम नाही, हे मला नातेवाइकांकडून ऐकायला मिळाले; पण वडील पाठीशी उभे राहिले, असे सांगत पॉवर गर्ल अमृता भगतने शेलू ते रोमानियाचा प्रवास उलगडला.
कर्जत तालुक्यातील शेलू या गावातील अमृत भगत हिने रोमानिया देशात झालेल्या आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावीत रौप्यपदकाला गवसणी घातली. अमृता हिने ४७ किलो इक्वीप गटात १२० किलो वजन उचलून इतिहास केला. ४० देशांतील खेळाडू स्पर्धेत सहभागी होते.
नेरळ ममदापूर येथील मातोश्री सुमती चिंतामणी टिपणीस महाविद्यालयात अमृताचे शिक्षण झाले. तिला लहानपणापासून क्रीडा क्षेत्राचे आकर्षण होते. १० वी पूर्ण केल्यावर अमृताने क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे सांगितले; मात्र तिला विरोध झाला. ती निराश झाली. मात्र तिच्या वडीलांनी तिच्या पंखांत बळ भरले आणि अमृताने वडलांचा विश्वास सार्थ ठरविला.
लय भारी वाटतं...मी जेव्हा रोमानियावरून परत आले तेव्हा माझ्या गावात माझं धडाक्यात स्वागत झालं. अनेकांनी माझा सत्कार केला. सेलिब्रिटी असल्यासारखं सगळे माझ्यासोबत सेल्फी, फोटो काढतात... लय भारी वाटते, असे अमृताने सांगितले.
...तर मी पॉवर लिफ्टिंगमध्ये नसतेमी रग्बीमध्ये ऑल इंडिया ब्रॉँझ मेडल मिळवलं आहे. खरंतर माझी सुरुवात ही कबड्डी, खो-खो, रग्बी अशी झाली होती; मात्र प्री ऑलिम्पिकमध्ये माझ्या पायाला दुखापत झाली. ज्यामुळे खेलो इंडियामध्ये माझी निवड हाेऊ शकली नाही. त्यामुळे मी पॉवर लिफ्टिंगकडे वळाले. जर तेव्हा माझ्या पायाला दुखापत झाली नसती तर मी आज पॉवर लिफ्टर खेळाडू नसते. अमृता ही कबड्डीत तरबेज होती. रग्बीतही तिचे प्रावीण्य आहे. तिने पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सहभाग घेतला आणि त्यात यश मिळवीत गेली. अमृताच्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर तिची निवड जागतिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी करण्यात आली होती. २१ ऑगस्ट रोजी ती रोमानियासाठी रवाना झाली होती.