ठाणे, प्रचंड रंगमंच, त्याला ‘खाकी’ वर्दीची तटबंदी, सराव करणारे स्पर्धक आणि महिला बॅण्ड पथक अशा तयारीने रविवारची पहाट सजली होती. ४० पोलीस अधिकारी, ४०० कर्मचारी, १०,००० संत निरंकारी संस्थेचे स्वयंसेवक असा फौजफाटा स्पर्धकांसाठी सज्ज होता. स्पर्धक, कलाकारांसह राजकारणातील तज्ज्ञ मंडळींनीदेखील स्पर्धेला हजेरी लावली. संत निरंकारी सेवा दल महिला बॅण्ड पथक आणि संत निरंकारी ब्रॉस पथक यांच्या तालावर नकळत उपस्थितांनी ठेका धरला. महिलांची स्पर्धा संपण्याच्या ठिकाणी (हिरानंदानी इस्टेट सर्कल) स्थानिक नृत्य कलाकारांनी दर्जेदार सादरीकरणही केले.ठाणे वर्षा मॅरेथॉनचे आयोजन अफलातून होते. चांगल्या स्पर्धकामुंळे मॅरेथॉनमध्ये धावायला मजा आली. विविध चेकपोस्टवर ठाणेकरांच्या चीअर्सने धावण्यासाठी ऊर्जा मिळत होती. या विजयाचे मानकरी माझे पती सचिन आणि वडील मारुती हेदेखील आहे. त्यांनी वेळोवेळी दिलेल्या पाठिंब्यामुळे मी जिंकू शकले, असे महिला गटातील उपविजेती नीलम कदम-राजपूत हिने सांगितले. मुंबई मॅरेथॉनमध्ये (४२ किमी) सलग तीन वर्षे दुसरा क्रमांक पटकावणारी विजयमाला पाटीलला यंदाच्या मॅरेथॉनमध्ये तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. पश्चिम रेल्वेमध्ये कार्यरत असलेली विजयमाला पाटील यंदा मुंबई मॅरेथॉनमध्ये अव्वल क्रमांक मिळवण्याच्या हेतूने धावणार आहे. मायक्रो चिपने मॅरेथॉनला मिळाला आंतरराष्ट्रीय दर्जायंदाच्या २६ व्या ठाणे महापौर मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना आयोजकांनी मोफत मायक्रो चिप दिली होती. यामुळे वेळेची अचूक नोंद झाली असून स्पर्धकांना यापुढे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जमेची बाजू झाली आहे.दोन वर्षांपासून ही चिप स्पर्धकांना देण्यासाठी मनपाकडून प्रयत्न होत होते. मात्र, काही कारणास्तव ती गेल्या वर्षीही स्पर्धकांना मिळाली नव्हती. यंदा मात्र पुरुषांच्या २१ किमीच्या खुल्या स्पर्धेतील २६७ आणि महिलांच्या १५ किमीच्या ५६ स्पर्धकांना या चिप्सचे वाटप केले होते. अशा ५०० चिप्ससाठी प्रायोजकांमार्फत अडीच लाखांचा खर्च केल्याचे उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली. ही चिप्स स्पर्धकांच्या छातीवरील बॅजवर लावली होती.
तू धाव पुढे...!
By admin | Published: August 24, 2015 2:32 AM