अल्पवयीन बांगलादेशी मुलींची सुटका
By admin | Published: June 27, 2017 03:34 AM2017-06-27T03:34:56+5:302017-06-27T03:34:56+5:30
बांगलादेश येथून नवी मुंबईत फूस लावून पळवून आणलेल्या दोन अल्पवयीन मुलींची सुटका करण्याची कारवाई, नवी मुंबई पोलिसांच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : बांगलादेश येथून नवी मुंबईत फूस लावून पळवून आणलेल्या दोन अल्पवयीन मुलींची सुटका करण्याची कारवाई, नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने केली आहे. या कारवाईत पोलिसांनी अल्पवयीन मुलींना फूस लावणाऱ्या दाम्पत्यासह तिघांना अटकही केली आहे.
बांगलादेशातील नोडाईल जिह्यातील १५ व १७ वयोगटातील दोन अल्पवयीन मुलींना जोशीम सोबुर मुल्ला (२५), याने फूस लावून नवी मुंबईत पळवून नेल्याची माहिती मुंबईतील जस्टीस अॅण्ड केअर या स्वंयसेवी संस्थेला मिळाली होती. त्यामुळे या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला याविषयी माहिती दिली. त्यानुसार गुन्हे शाखेचे उपायुक्त तुषार दोषी यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक सुनीता भोर, पोलीस उपनिरीक्षक संजय क्षीरसागर व त्यांच्या पथकाने नवी मुंबईच्या विविध भागांत शोध घेण्यास सुरु वात केली. या शोधमोहिमेदरम्यान बांगलादेशातून पळून आणलेल्या मुलांना तुर्भे स्टोअर्स भागातील एका खोलीमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सदर माहितीच्या अनुषंगाने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने कुरिअर बॉय, तसेच जनगणना अधिकारी अशाप्रकारे वेशांतर करून अल्पवयीन मुलींचा शोध सुरू केला. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने तुर्भे स्टोअर्समधील संशयित घरावर छापा मारला असता, सदर घरामध्ये बांगलादेश येथून बॉर्डरमार्गे पळवून आणलेल्या दोन्ही अल्पवयीन मुली आढळून आल्या. या वेळी मुल्ला दाम्पत्याने सदर मुलींचे लैंगिक शोषण होईल, अशा पद्धतीने त्यांना ठेवून त्यांच्याकडून घरकाम करून घेत असल्याचे आढळून आले. या वेळी दोन्ही मुलींकडे विचारपूस करण्यात आली असता, जोशीम मुल्ला याने त्यांना फूस लावून पळवून आणल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही मुलींना ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली. त्यानंतर पोलिसांनी या अल्पवयीन मुलींना पळवून आणणाऱ्या जोशीम मुल्ला व त्याची पत्नी मुर्शीदा जोशीम मुल्ला यांना अटक केली.