कोपरखैरणेत नोकरी गेल्याने तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 04:44 AM2020-06-25T04:44:06+5:302020-06-25T04:44:11+5:30
पूर्वकल्पना न देता कंपनीने कामावरून काढल्याने तीन महिन्यांपासून तो चिंतित होता.
नवी मुंबई : कंपनीने कामावरून काढल्याने बेरोजगार झालेल्या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना कोपरखैरणेत सोमवारी घडली. पूर्वकल्पना न देता कंपनीने कामावरून काढल्याने तीन महिन्यांपासून तो चिंतित होता.
अमर पवार (४०) असे त्याचे नाव असून कोपर खैरणे सेक्टर १७ येथे तो पत्नी व दोन मुलांसह राहत होता. लहान मुलगी विकलांग आहे. तळोजा येथील एका केमिकल कंपनीत तो कामाला होता. कंपनीने नव्या कामगारांना ठेवून त्याला कामावरून काढल्याने तो बेरोजगार झाला. दरम्यान, लॉकडाऊन वाढतच गेल्याने आर्थिक संकट कोसळले होते. पत्नी व दोन मुलांना गावी पाठविले होते. परंतु सोमवारी रात्री त्याच्याशी घरच्यांचा संपर्क न झाल्याने त्यांनी शेजारच्यांना कळवले. घराचा दरवाजा आतून बंद असल्याने शेजारच्यांनी पोलिसांना कळविले. या वेळी घरामध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. त्यांच्या आत्महत्येची नोंद कोपर खैरणे पोलिसांत करण्यात आली आहे.