नवी मुंबईतील तरुणांनाच कोरोनाचा सर्वाधिक धोका; घरातील कर्त्या व्यक्तींचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2020 12:32 AM2020-12-05T00:32:03+5:302020-12-05T00:32:16+5:30
४४५ कुटुंबीयांचा आधार हरपला, तरुणाईमध्ये मृत्यूचे प्रमाणही लक्षणीय आहे. २० ते ५० वयोगटांतील तब्बल ४४५ जणांचा मृत्यू झाला आहे.
नामदेव मोरे
नवी मुंबई : कोरोनाविषयी निष्काळजीपणा तरुणाईसाठीही धोकादायक ठरत आहे. आतापर्यंत नोकरी, व्यवसाय करणाऱ्या व घराचा आधार असणाऱ्या २० ते ५० वयोगटांतील तब्बल ४४५ जणांचा मृत्यू झाला आहे. या वयोगटातील तब्बल २९ हजार २१४ जणांना कोरोची लागण झाली आहे. धोका अजून टळलेला नसल्यामुळे सर्वच वयोगटांतील नागरिकांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
नवी मुंबईमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्यास महानगरपालिकेस यश येऊ लागले आहे. या आठवड्यात रग्णवाढीपेक्षा बरे होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. कोरोनामुक्तीची टक्केवारी धिम्या गतीने का होईना, पण सुधारू लागली आहे. प्रादुर्भाव कमी होत असला, तरी धोका पूर्णपणे टळलेला नाही. सद्यस्थितीमध्ये नागरिकांमधील विशेषत: तरुणाईमध्ये निष्काळजीपणा वाढत आहे. २० ते ५० वयोगटांतील नागरिक सर्वाधिक वेळ घराबाहेर असल्याचे निदर्शनास आले आहे. कोराेनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून नाेकरी, व्यवसाय व अर्थार्जनासाठी तरुणाईला घराबाहेर पडावे लागत आहे. कुटुंबीयांची जबाबदारी सांभाळताना घराबाहेर पडणे आवश्यक आहे, पण अशा वेळी मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणेही आवश्यक आहे, परंतु अनेक जण नियमांचे पालन करत नाहीत. यामुळे प्रादुर्भाव होत आहे.
तरुणाईमध्ये मृत्यूचे प्रमाणही लक्षणीय आहे. २० ते ५० वयोगटांतील तब्बल ४४५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामधील अनेक जण कुटुंबीयांचा आधार होते. काही जण कुटुंबामधील एकटेच कमवती व्यक्ती होती. अनेक जण यशस्वीपणे व्यवसाय करत होते. मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या भाजी मार्केटमधील तरुण व्यापाऱ्याचाही कोरोनामुळे मृत्यू झाला असून, त्यांच्या परिवारातील तीन जणांचा पंधरा दिवसांत मृत्यू झाल्यामुळे कुटुंबातील उर्वरित सदस्यांनाही मोठा धक्का बसला आहे. सीवूडमधील डॉक्टर व त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला असून, घरामध्ये फक्त तरुण मुलगा जिवंत आहे. नेरुळमधील एक तरुण वकील व सामाजिक कार्यकर्त्याचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ज्या चौकामध्ये त्यांच्या नवीन नियुक्तीचा फलक लागला होता, त्याच चौकात काही दिवसांमध्ये श्रद्धांजलीचा फलक लावावा लागला.
नियमांचे पालन आवश्यक
नोकरी, व्यवसायानिमित्त घराबाहेर जाणाऱ्या तरुणांची संख्या जास्त आहे. २० ते ५० वयोगटांत सर्वात जास्त कोरोनाची लागण झालेली निदर्शनास आले आहे. घराबाहेर गेल्यामुळे तरुणाईला कोरोनाची लागण होते व त्यांच्यामुळे घरातील इतरांनाही लागण होत आहे. यामुळे तरुणांनी स्वत:च्या कुटुंबीयांसाठी तरी नियमांचे पालन करावे, अशी मागणी होत आहे.