माणुसकीच्या भिंतीआडून काढतायेत तरुणींची छेड
By सूर्यकांत वाघमारे | Published: December 11, 2023 05:55 PM2023-12-11T17:55:22+5:302023-12-11T17:56:05+5:30
"नको ते द्या आणि हवे ते घ्या" या उद्देशाने महापालिकेने शहरात ठिकठिकाणी माणुसकीच्या भिंतीचे शेड उभारले आहेत.
नवी मुंबई : गरजूंच्या सोयीसाठी महापालिकेने उभारलेली माणुसकीची भिंतच मुलींची छेड काढण्यासाठी वापरली जाऊ लागली आहे. कोपर खैरणेत महाविद्यालयाला लागूनच पदपथावर असलेल्या माणुसकीच्या भिंतीवर जाणीवपूर्वक महिला व पुरुषांचे अंतर्वस्त्र लटकवले जात आहेत. हा प्रकार विद्यार्थिनींना लज्जास्पद वाटत असून तिथून चालताना कुचंबणा होत आहे.
"नको ते द्या आणि हवे ते घ्या" या उद्देशाने महापालिकेने शहरात ठिकठिकाणी माणुसकीच्या भिंतीचे शेड उभारले आहेत. अनेक ठिकाणी हे शेड गरजूंना उपयुक्त ठरत आहेत. तर काही ठिकाणी हे शेड कचरा कुंडी प्रमाणे वापरले जात आहेत. तर काही ठिकाणी माणुसकीच्या भिंतीची जागा चुकल्याने ते वापराविना पडून आहेत. अशाच प्रकारे कोपर खैरणे येथे रा.फ. नाईक विद्यालय व एफ. जी. नाईक महाविद्यालयाला लागूनच पदपथावर माणुसकीच्या भिंतीचे शेड उभारण्यात आले आहे. यामुळे पदपथावर चालणाऱ्यांना अडचण होत असून शेडच्या खालीच कचरा साचला आहे.
अशातच या माणुसकीच्या भिंतीच्या आडून महाविद्यालयीन तरुणींची छेड काढण्याचा प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून त्याठिकाणी पदपथावर महिला, पुरुषांचे अंतर्वस्त्र टाकले जात आहेत. तसेच शेडमध्ये देखील ते लटकवले जात आहेत. यामुळे तिथून ये जा करणाऱ्या विद्यार्थिनींच्या मनात लज्जा निर्माण होऊन त्यांची कुचंबणा होत आहे. याबाबत अनेकींनी शिक्षिकांकडे त्यांची होणारी कुचंबणा बोलून देखील दाखवली आहार.
यामुळे प्राचार्य प्रताप महाडिक यांनी तिथले शेड इतरत्र हलवावे यासंदर्भात अनेकदा महापालिका अधिकाऱ्यांना कळवले आहे. परंतु स्वच्छता अभियानाच्या नावाखाली दिखाव्याला उभारलेले हे शेड तिथून हटवण्यात व मुलींची काढली जाणारी छेड थांबवण्यात प्रशासन उदासीनता दाखवत आहे.