...तर मृतांचा दशविधी रस्त्यावर करू; युवक काँग्रेसचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 02:02 PM2019-07-09T14:02:18+5:302019-07-09T14:10:50+5:30
पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
नवी मुंबई : सायन पनवेल महामार्गावर भेडसावणाऱ्या समस्यांवरून अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. त्याकरिता तुर्भेतील पीडब्ल्यूडीच्या कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी दोन दिवसात संबंधितांवर गुन्हे दाखल न झाल्यास आजवर महामार्गावर मयत पावलेल्यांचे दशकार्य रस्त्यावर घालू असा इशारा देण्यात आला.
सायन पनवेल मार्गावरील समस्या मार्गी लागत नसल्याने दिवसेंदिवस या मार्गावरील प्रवाशी व वाहनचालक यांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. त्यात अनेकांचे प्राणदेखील गेले आहेत. मार्गावरील पथदिवे अनेक ठिकाणी बंद असल्यानेही रात्रीच्यावेळी गैरसोय होत आहे. यामुळे गतमहिन्यात तुर्भे येथील पुलावर अपघातामध्ये शीघ्र कृती दलाच्या जवानाचा तर पुलाच्या उताराला बीएआरसीच्या कर्मचाऱ्याच्या मृत्यूची घटना घडलेली आहे. तर दोन दिवसांपूर्वी सानपाडा पुलाखाली उघड्यावर पडलेल्या विद्युत वायरीमुळे सुरेश जुनघरे या पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
गतवर्षीदेखील पावसाळ्यात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात घडून अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. तर यंदाही पावसाच्या सुरवातीलाच महामार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी युवक काँग्रेसच्या वतीने 'बेड्या ठोको' आंदोलन करण्यात आले. युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष निशांत भगत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी संबंधी अधिकारी उपस्थित नसल्याने आंदोलकांच्या शिष्टमंडळाला समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे दोन दिवसात संबंधितांवर गुन्हे दाखल न झाल्यास सायन पनवेल महामार्गावर आजवर अपघातामध्ये मृत पावलेल्याचे दशकार्य रस्त्यावर करण्याचा इशारा निशांत भगत यांनी पीडब्ल्यूडीला दिला आहे.