युथ हॉस्टेलचा वीजपुरवठा खंडित, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची उदासीनता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 04:26 AM2018-12-27T04:26:44+5:302018-12-27T04:26:51+5:30
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने कोट्यवधी रुपये खर्च करून खारघर शहरात युथ हॉस्टेल उभारले आहे.
- वैभव गायकर
पनवेल : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने कोट्यवधी रुपये खर्च करून खारघर शहरात युथ हॉस्टेल उभारले आहे. या प्रशस्त वसतिगृहाचे काम पूर्ण होऊन देखील उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असताना पर्यटन विकास महामंडळाच्या उदासीन कारभारामुळे महावितरणने याठिकाणचा वीजपुरवठा खंडित केला आहे.
महाराष्ट्र पर्यटनाला चालना मिळण्यासाठी एमटीडीसीमार्फत विविध उपक्र म राबविले जातात. पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्यभरात हॉटेल्स, वसतिगृह उभारण्यात आले आहेत. याच धर्तीवर खारघर सेक्टर १२ याठिकाणी भूखंड क्र मांक १० वर हे वसतिगृह उभारण्यात आले आहे. प्रशस्त अशा पाच मजली वसतिगृहामध्ये चोवीस खोल्या, कॉन्फरन्स रूम, रेस्टॉरंट, वाचनालय, व्यायामशाळा, ग्रंथालय आदींचा समावेश आहे. संबंधित वसतिगृहाचे काम पूर्ण होऊन देखील सध्याच्या घडीला ते धूळखात पडले आहे. विशेष म्हणजे वेळेवर वीज बिल न भरल्याने महावितरणने याठिकाणचे मीटर काढले आहे. सुमारे नऊ कोटी खर्चून हे वसतिगृह उभारण्यात आलेले आहे.
नवी मुंबई परिसरातील पर्यटन ठिकाणे, याठिकाणची कनेक्टिव्हिटी पाहता खारघर शहराची निवड हे वसतिगृह उभारण्यासाठी करण्यात आली. मात्र महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे नियोजन कुठे तरी चुकत असल्याचा मुद्दा काँग्रेसने उपस्थित केला आहे.
यासंदर्भात खारघर शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ. स्वप्निल पवार यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे संचालक अभिमन्यू काळे यांना पत्र पाठवून लवकरात लवकर हे युथ हॉस्टेल सुरू करण्याची मागणी केली आहे.
नवी मुंबई, रायगड परिसरात येणाऱ्या पर्यटकांना हे हॉस्टेल केल्यास अनेकांची गैरसोय दूर होईल अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.