तरुणांकडून बेलापूर किल्ल्याची स्वच्छता, गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी घेतला पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 04:56 AM2018-12-19T04:56:03+5:302018-12-19T04:56:28+5:30
१५० हून अधिकांचा सहभाग : गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी घेतला पुढाकार
नवी मुंबई : नामशेष होत चाललेल्या गड-किल्ल्यांच्या संवर्धनाच्या उद्देशाने बेलापूर किल्ल्याची स्वच्छता करण्यात आली. युगनिर्माते प्रतिष्ठानच्या वतीने राबवण्यात आलेल्या या अभियानात १५० हून अधिक तरुण-तरुणींनी सहभाग घेतला होता.
राज्यातील गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी तरुणांमध्ये जागरूकता वाढत चालली आहे, त्यानुसार नवी मुंबईच्या युगनिर्माते प्रतिष्ठानच्या वतीनेही गड-किल्ले संवर्धनाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याची सुरुवात बेलापूरच्या प्राचीन किल्ल्यापासून करण्यात आली, या करिता वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे विद्यार्थी, पालिकेच्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी यांच्या सहयोगाने बेलापूर किल्ला परिसराची स्वच्छता करण्यात आली. या अभियानात १५० हून अधिक तरुण, तरुणींनी सहभाग घेतला होता. बेलापूर किल्ला ही शहराला लाभलेली ऐतिहासिक वास्तू संवर्धनाअभावी नामशेष होत चालली आहे. तिचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने तिथे पर्यटनाला चालना मिळावी, याकरिता प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज युगनिर्माते प्रतिष्ठानचे अध्यक्ष शंकर वसमाने यांनी व्यक्त केली आहे. या वेळी पालिकेचे अधिकारी राजेंद्र सोनवणे, उपस्वच्छता निरीक्षक विजय नाईक, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्रद्धा निकम, प्रणेश भुवड, आकाश वसमाने, अशुतोष शिंदे, आशिष औटी, मुकुल इंगळे, उत्कर्षा बनसोडे, प्राजक्ता गायकवाड आदी उपस्थित होते. या मोहिमेअंतर्गत तरुणांनी किल्ल्यावर तसेच परिसरात जमा केलेला कचरा पालिकेकडे विल्हेवाट लावण्यासाठी सोपवण्यात आला. तसेच घर व शहराच्या स्वच्छतेची शपथही घेतली.