रेल्वेतून ढकलणा-या तरूणाची ओळख पटली, जुईनगर रेल्वेस्थानकातील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 02:16 AM2017-12-09T02:16:16+5:302017-12-09T02:16:16+5:30
लुटीच्या उद्देशाने तरुणीला रेल्वेतून ढकलणा-याची ओळख पटली असून, रेल्वे पोलीस त्याचा शोध घेत आहेत. संतोष केनन (२८), असे त्याचे नाव असून तो पॉलिटेक्निकल इंजिनीअरिंगचा विद्यार्थी आहे
नवी मुंबई : लुटीच्या उद्देशाने तरुणीला रेल्वेतून ढकलणा-याची ओळख पटली असून, रेल्वे पोलीस त्याचा शोध घेत आहेत. संतोष केनन (२८), असे त्याचे नाव असून तो पॉलिटेक्निकल इंजिनीअरिंगचा विद्यार्थी आहे. पोलिसांनी त्याच्या घरातून पीडित तरुणीची बॅग व सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
वाशी येथे राहणा-या ॠ तुजा बोडके हिला रेल्वेतून ढकलल्याचा प्रकार जुईनगर रेल्वेस्थानकात घडला होता. ती वैद्यकीय शाखेची विद्यार्थिनी असून, बडोदा येथे शिक्षण घेत आहे. शनिवारी ती घरी येत असताना पनवेलमधून वाशीकडे येणाºया लोकलमध्ये बसली होती. या वेळी रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास लोकल नेरुळ ते जुईनगर रेल्वेस्थानकादरम्यान असताना तिच्यासोबत हा प्रकार घडला होता. महिला डब्यात ती एकटीच असताना त्यामध्ये चढलेल्या एका तरुणाने तिला लुटण्याचा प्रयत्न केला होता. या वेळी तिने त्याला प्रतिकार केला असता, सदर तरुणाने तिला चालत्या रेल्वेतून खाली ढकलले होते. त्यानंतर जुईनगर रेल्वेस्थानकात उतरून त्याने पळ काढला होता. या प्रकारात ॠ तुजाकडील बॅगमधील वस्तू, सोन्याचे दागिने व मोबाइल, या वस्तू चोरीला गेला होता. सुदैवाने लुटारूने तिला रेल्वेतून खाली ढकलले तेव्हा लोकल स्थानकात येत असल्याने गती कमी होती. यामुळे तिचे प्राण वाचू शकले. मात्र, घटनेनंतर ती पुढील रेल्वेने जखमी अवस्थेत वाशीला आली असता, कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. या प्रकरणी रेल्वे पोलिसांना माहिती दिल्यानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान स्थानकातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्या लुटारूची ओळख पटली. संतोष केनन (२८), असे त्याचे नाव असून तो कल्याणचा राहणारा आहे. शिवाय तो पॉलिटेक्निकचा विद्यार्थी असल्याचेही समोर आले आहे. या माहितीनुसार जीआरपीच्या पथकाने बुधवारी रात्री त्याच्या कल्याणमधील राहत्या घरी धडक दिली. या वेळी तो घरी आढळून आला नाही. मात्र, घराच्या झडतीमध्ये ॠ तुजाची चोरी झालेली बॅग व कानातील सोन्याचे दागिने आढळून आले आहेत.